सामाजिक विचार

१. माणसाचं कार्य हे पानात कात आणि दिव्यात वात असं असाव.
२. एखाद्या व्यक्तीच्या हाती हात दिल्याने त्याचे गुण आम्हा मध्ये येणार नाहीत परंतु देवाच्या हाती हात दिल्याने त्याचे गुण आम्हा मध्ये विकसित होतील.
३. तुमच्या शब्दांची गुंफण ही गोफण असली पाहिजे शब्द फेकला की अचूक वेध घेतला पाहिजे.
४. एक जोराचा वारा आला आणि मी लिहिलेल्या कवितेचा कागद सोबत घेऊन गेला…ढगांनी ती कविता वाचून अश्रू ढाळले, लोक मात्र आनंदीत होऊन पाऊस आला म्हणाले
५. लेकरानं आईच्या उदरात प्रतिदिनी जगात जन्म घेण्याकरिता वाढत जाव आणि जगात जन्मल्यानंतर प्रतिदिनी ख्रिस्तात वाढत जाव.
६. गुरु मित्राच्या शाबासकीची थाप तुमची पाठ इतकी बळकट बनवते की विरोधकाचे वार तिच्यावर चालतच नाहीत.
७. चांगलं ते आठवावे आणि साठवावं
८. खान तशी माती आणि ज्ञान तशी मती
९. जेव्हा तुम्ही एखाद्याचा आदर करता तेव्हाच तुम्ही त्याची कदर करता
१० दुसऱ्याची पत पाहण्याआधी स्वतःची गत पहावी
११. मनुष्याने देवळात दूत आणि घरात भूत असे नसावे
१२. एखाद्या व्यक्तीला सेवेचे पाचारण आहे का हे पाहायचे असेल तर त्याचे आचरण पाहावे
१३. व्यापाऱ्याला मापाचे, वैद्याला तापाचे आणि गारुड्याला सापाचे गुण माहित असावे
१४. गरिबाला नाडू नका, शिस्त आणि चांगले व्यक्तींची साथ कधी सोडू नका, आदर्श व्यक्तींचा कित्ता खोडू नका, नियम कधी मोडू नका, नीती मूल्यांची पुस्तके फाडू नका.
१५. माणसाने घर ढासळल्याप्रमाणे ढासळून जाऊ नये. लोक दिवसा शांत्वन करण्याकरिता व रात्रीचे विटा उचलून न्यायला येतील
१६. गरिबांन घर सारवलं तर त्याला सावरल्या सारखं वाटतं, श्रीमंतांन घर सावरलं तर त्याला बावरल्यासारखं वाटतं.
१७. आपण कोणाच्या दृष्टीने पडू नये आणि कोणाच्या दृष्टीस पडू नये अशी कृत्ये करू नये.
१८. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचे असते. मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो अथवा गैरसमजातून.
१९. माणसं जरी सोन्या सारखी असली तरी त्यांच्यात कॅरेटचा फरक असतोच.
२०. काही गोष्टी रेंगाळलेल्या छान दिसतात
जसे की…….
श्वासांमध्ये सुगंध,
चेहऱ्यावर केसांची बट,
ओठांवर स्मित.
२१. जेव्हा तुम्ही देवाच्या बाजूने असता तेव्हा देव तुमच्या बाजूने आहे किंवा नाही या गोष्टीची पडताळणी करण्याची गरज भासत नाही.
२२. श्वास मनुष्यामध्ये जीव ठेवतो
तर
स्वप्न मनुष्यामध्ये जिवंतपणा ठेवतात.
२३. वेदनांना साक्षीदार मिळतात, फारच झालं तर साथीदारही मिळतात, परंतु भागीदार मिळत नाहीत.
२४. आज मनुष्य स्वप्न खूप पाहतो परंतु त्याला शांत झोप नाही.
२५. नातीगोती भरपूर असावीत परंतु नात्यात गोती नसाव्यात आणि नाती गोत्यात येऊ नयेत.
२६. लोकांकडून “माणिक’ ही उपाधी मिळविण्यासाठी तुम्ही’ प्रामाणिक’ असणे गरजेचे आहे.
२७. शब्द दिल्याने आशा निर्माण होते आणि शब्द पाळल्याने विश्वास निर्माण होतो.
२८. छोट्या लोकांच्या सावल्या मोठ्या पडायला लागल्या की सूर्य अस्ताला चालला असे समजावे.
२९. शब्दात भाव असेल तर शब्दाला भाव असेल
३०. काळजी घ्यायची असते करायची नसते.
३१. आयत्यावेळी यशस्वी होणारी एकच गोष्ट असते ती म्हणजे फजिती.
३२. संधीच्या दारावर दोन शब्द लिहिलेले असतात….
ढकला किंवा ओढा.
३३. या दुनियेत लोक खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, सत्य मात्र सिद्ध कराव लागत.
३४. जास्तीत जास्त वेळेला उघडली जाणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे तोंड.
३५. सदाचरणाला सुट्टी नसते आणि धर्माचरणाला रजा नसते.
३६. आमच्या शब्दांना धार आणि आधार असणे अपेक्षित आहे.
३७. प्रत्येकाच्या नजरेत आपण चांगले असू शकत नाही म्हणून स्वतःच्या नजरेत तरी आपण निर्दोष असले पाहिजे.
३८. जे संबंध जोडतात ते नातेवाईक ठरतात,
जे संबंध मोडतात ते नाते-वाईट ठरतात.
३९. मनुष्यच मनुष्याच्या मार्गात आडवा जात असतो आणि आम्ही उगाचच मांजराला दोष देतो.
४०. जेंव्हा एखादी व्यक्ती तुमच्या ढीगभर अवगुणांकडे दूर्लक्ष करून तुमच्या सद्गुणांकडे निर्देश करते, तेंव्हा समज़ुन घ्या की तिच्या मनांत तुमची प्रगती व्हावी अशी ईच्छा आहे.