उखाणे

पवित्र शास्त्र (बायबल) हे अनेक चरित्रांनी युक्त पवित्र ग्रंथ आहे. त्या पैकी अनेक स्त्री चरित्रांच्या दृष्टीकोणातून उखाणे तयार करण्याचे कसब सुनिल रणनवरेंनी अवगत केलेले आहे.
हवा बाई (आद्य स्त्री) –
१. आधी निर्मिले जल, मग निर्मिली मासळी, आदाम रावांचं नाव घेते मी त्यांची फासळी
२. एदेनच होत सासर माझं, एदेनच होतं माहेर, नको ते फळ दिल आदमरावांना, देवानं हाकललं बाहेर
सारा बाई –
३. दुपारची होती वेळ, उष्ण होता वारा, अब्राहम बसले होते डेऱ्यात, अन खुदकन हसली सारा
रिबेका –
४. विहिरितून पाणी हापसले मी कंबर कसून, इसहाकरावांसाठी गेले मग उंटावर बसून
एस्माईलाची बायको –
५. सारेन सांगितलं अब्राहामाला, हागारेपासून वंश तुझा तू वाढव, इस्माईल राव दिसत नाहीत कुठं, त्यांना म्हणतात रान गाढव
रुथ –
६. बेथलेहेम एफ्राथात दुष्काळ मोठा आला, सासरा सहकुटुंब मवाबात आला, महलोंन मेला,खिल्योन मेला, सांगितलं सासून म्हणून बवाज मी केला
दलीला –
७. शमशोन रावांना मी आज खूप छापले, मांडीवर थोपटून थोपटून त्यांचे केस कापले
बथशेबा –
८. इस्रायल व अमोनी यांच्या युद्धाचा प्रसंग चिघळला, बथशबेला पाहून दावीद राजा पिघळला
इजबेल –
९. कर्मेलावर पडला पाऊस, शमरोनात घुसला लोंढा, आहाब राजा इजबेलीपुढे घोळतो गोंडा
शोमरोनी स्त्री –
१०. ख्रिस्त राजाला नमस्कार करते वाकून, एकाच गाड्याचं नाव घेते चार गडी राखून
राहेल –
११. दुसऱ्यांना फसविण्याची फळ, स्वारीनेही आहेत चाखली, या राहेली साठी याकोबाने चौदा वर्ष गुरे राखली
हेरोदिया –
१२. लॅटिनमध्ये आत्म्याला म्हणतात सायको, फिलिपाचे नाव घेते अंतिपासाची बायको
ख्रिस्ताची वधू (मंडळी) –
१३. वचनाने त्याच्या ग मी आहे न्हाले, तारणाची वस्त्रे ग मी आहे ल्याले, मी ख्रिस्ताची झाले ग मी ख्रिस्ताची झाले
सप्पीरा –
१४. पवित्र आत्म्याशी खोटे बोलून पैसे नाही मागे उरले,
हनन्या मागोमाग मला पण पुरले.
मानोहाची पत्नी –
१५. पुत्र होईल मला असा दूताने निरोप दिला,
पुढे काय करावे हे मी न विचारल्याने मानोहाने कल्ला केला.
मीखल –
१६. देवाच्या कोषापुढे दावीदराव नाचले,
मी त्यांना हसले अन् निपुत्रिक होऊन बसले.
एस्तेर –
१७. मेले तर मेले असे बोलून राजवस्त्र ल्याले,
अहश्वेरोश महारांजांपुढे पत्नी म्हणून आले,
नेमले होते मरण
पण गोत्र वाचवण्याचे मी झाले कारण.
नामी –
१८. नवरा माझा अलीमलेख, नावाचा अर्थ देव माझा राजा;
एफ्राथ सोडून गेलो मवाबात, वाजला संसाराचा बाजा.