शोक करणारे ध्यन्य!

“जे शोक करितात ते धन्य, कारण त्यांस सांत्वन प्राप्त होईल” (मत्तय ५:४) या वचनावर चिंतन करू या. ‘धन्य’ या शब्दासाठी पवित्र बायबल मध्ये हिब्रु भाषेतील ‘अशेर’ हा शब्द वापरला आहे व अशेर या शब्दाचा अर्थ ‘अभिनंदन’ असा होतो.
ज्यावेळी आपण वरील वचन वाचतो त्यावेळी शोक करणाऱ्यांना ‘धन्य’ किंवा ‘अभिनंदन’ असे ख्रिस्ताने का म्हटले असावे असा प्रश्न मनात येतो. शोक केल्यानंतर जर ख्रिस्ताकडून आंम्ही ‘धन्य’ होत असू किंवा आमचे अभिनंदन होणार असेल तर पूर्ण जीवनभर आम्ही शोक करावा काय? जीवनांत आनंद करणे चुकीचे किंवा व्यर्थ आहे का? या प्रश्नावर चिंतन करण्यासाठी आपण पुन्हा एकदा पवित्र बायबल मधील मूळ शब्दांचा अभ्यास केल्यास हा प्रश्न सुलभ होईल. येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनीही खूप दुःख सहन केले आणि ज्या ख्रिस्ताने अनंत दुःखे साहिली तोच आम्हाला समजू शकतो व आमचे सांत्वन करील या विश्वासात ते जीवन जगले.
पवित्र बायबल मध्ये असेही लिहीले आहे की, “आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा व शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा” (रोम १२:१५). त्याचप्रमाणे, “प्रभूमध्ये आनंद करा” (फिलिपै ३:१); व “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुनः म्हणेन, आनंद करा” (फिलिपै ४:४). ही वचनें अतिशय अर्थपूर्ण आहेत. या वचनांवर आपण पुढे चिंतन करू. परंतु सर्वदा आनंद करणे म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखापासून स्वतःला अलीप्त ठेवणे असा अर्थ नाहीं. ती देवाच्या वचनांची प्रतारणा होइल व अशा प्रवृत्तीच्या लोकांसाठी ख्रिस्त म्हणतो, “अहो तुम्ही आता हसतां त्या तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही शोक कराल व रडाल” (लूक ६:२५). ते काइना प्रमाणे स्वतःच्या निर्णयाने आपले जीवन जगतात, कारण ते स्वत:चेच विचार व कल्पनांप्रमाणे जीवनाचा अर्थ लावतात. दुराचार व अनीति हेच त्यांचे आनंद देणारे मार्ग असतात. शोक करणे त्यांना माहित नसते. त्यांच्या मुर्खपणात अपराध करणे त्यांना थट्टा वाटते. (नीति १४:९)
वास्तविक शोक करणाऱ्यांचे आंम्ही सांत्वन करावे. “सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो” (यशया ४०:१). शोकग्रस्तांना सांत्वन देण्यासाठी येशू ख्रिस्त पृथ्वीवरं आला. “प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे;…सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे, सीयोनातील शोकग्रस्तांस राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे त्यांस शोकाच्या ऐवजी हर्षरुप तेल द्यावे;…म्हणून त्याने मला पाठविले आहे” (यशया ६१:१-३). या वचनात ‘राखेच्या ऐवजी शिरोभूषण’ हे शब्द महत्वाचे आहेत. राख पश्चातापाचे द्योतक आहे व पश्चाताप पापक्षमेसाठी आहे. या ठिकाणी प्रायश्चिताची जाणीव आहे; पाप केल्याची टोचणी आहे, क्षमायाचना आहे.
सांत्वन करणे यासाठी मूळ ग्रीक बायबलमध्ये ‘पॅराकॅलेव्ह’ हा शब्द वापरला आहे व हिब्रु बायबलमध्ये ‘नखाम’ हा शब्द वापरला आहे. या शब्दांचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ काकुळतीने केलेली विनवणी व दुसरा अर्थ जवळ घेणे किंवा आश्रय देणे. याचाच अर्थ असा की, येशू ख्रिस्त शोकग्रस्तांचे सांत्वन करील म्हणजे: १) काकुळतीने विनवणी करील व २) त्यांना जवळ घेईल, त्यांना आश्रय देईल. ही गोष्ट अधिक स्पष्ट होण्यासाठी ‘शोक करणे’ म्हणजे काय व शोक करण्यात कोणती धन्यता आहे यावर विचार करू.
शोक करणे यासाठी हिब्रु भाषेतील शब्द आहे ‘अबाल’ व अबालचा अर्थ आहे मृतासाठी रडणे, कोणालातरी किंवा कशालातरी मी दुरावला गेलो, ‘पारखा झालो’, म्हणून रडणे. याकोबाच्या मुलांनी त्यांच्या भावाला म्हणजे योसेफाला मिसर देशात विकले व त्याचा झगा एक बकरा मारुन त्याच्या रक्तांत भिजविला. त्यांनी तो याकोबाकडे आणून म्हटले कीं, हा झगा आपल्या मुलाचा आहे की काय ते ओळखावे. याकोबाने तो झगा ओळखला व हिंस्त्र पशुने योसेफाला फाडून टाकिले असे समजून योसेफासाठी ‘शोक’ केला. (उत्पत्ती ३७:३१-१५) त्याचप्रमाणे कनान देश हेरण्यासाठी जे हेर मोशेने पाठविले होते त्यांपैकी अनिष्ट बातमी देणारे पुरुष मरीने मृत्यु पावले. मोशेने जेंव्हा हे इस्त्राएल लोकांना सांगितले तेंव्हा त्यांनी ‘शोक’ केला. (गणना १४:३९). दाविदानेही त्याचा प्रिय पुत्र अबशालोम याच्या वधाची बातमी ऐकल्यानंतर विव्हळ होऊन ‘शोक’ केला (२ राजे १९:१). संदर्भित प्रत्येक वचनामध्ये ‘शोक’ केला यासाठी मूळ हिब्रू भाषेत ‘अबाल’ हा शब्द वापरला आहे. या शास्त्रपाठातील ‘अबाल’ शब्दाच्या वापरावरुन असा विचार मनात येण्याची शक्यता आहे की, जे मृतांसाठी शोक करतात त्यांना ‘धन्य’ का म्हटले आहे व त्यांचेच सांत्वन केले जाणार का? मृतांसाठी शोक करण्यात येवढी ‘धन्यता’ कोणती व कशामुळे?
ज्यावेळी मी स्वत: पाप करतो त्यावेळी मी देवापासून दूर जातो. माझी पातके मी व माझा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणें उभी राहतात (यशया ५९:२) विशेष म्हणजे पापाचे वेतन मरण आहे. (रोम ६:२३) माझ्या पापांमुळे मी आध्यात्मिकरित्या मरतोच मरतो परंतु त्यामुळेच जे अविनाशी जीवन देवाने मला देऊ केलेले होते त्याला मी पारखा होऊन शारीरिकदृष्ट्या सुद्धा मरण ओढवून घेतों. मला माझ्या मरणाची जाणीव होऊन देवापासून मी दुरावला गेलो आहे ह्याचे मूळ कारण म्हणजे माझे पाप आहे हे मला कळते. पाप केल्याच्या तीव्र जाणीवेने जो त्या मृतासाठी म्हणजे स्वत:च्या तारणासाठी ‘शोक’ करतो व ख्रिस्ताकडे वळतो, त्याचे सांत्वन करण्यासाठी व जे हरवले होते ते त्याला परत मिळवून देण्यासाठी, त्यांना दूर न ठेवता जवळ घेऊन आश्रय देण्यासाठी येशू ख्रिस्तावर प्रभू परमेश्वराचा आत्मा आला. त्यांच्यासाठी ख्रिस्त काकुळतीने देवाकडे विनंती करील म्हणून ते ‘धन्य’.
माझ्या पापाबद्दल मी केवळ दुःखी न होता त्या बद्दल मी शोकाकूल होणे आवश्यक आहे. पापाची खरी टोचणी केवळ हृदयाला दुःख देत नाही तर डोळ्यांना अनावर अश्रू देते. आंम्ही शोकाकूल झाल्यावर आंम्हाला आमच्या सोबत्यांची आठवण आणि उणीव भासते. विशेष म्हणजे जो खरा सोबती (माझा देव ) त्याच्या सहभागीतेची आवश्यकता जाणवते. सुखसौख्याशी संवाद साधत आम्ही आयुष्यात बरीच लांब पल्याची वाटचाल करतो परंतु आम्हाला सुखसौख्य सुज्ञता देत नाहीं. दुःखाबरोबर काहीही न बोलता थोडे अंतर चालल्यास तेही आपल्याबरोबर काही बोलत नाहीं, तरीही बरीच सुज्ञता देवून जाते. आंम्ही वस्तूंवर प्रेम करण्यापेक्षा व्यक्तिंवर प्रेम केल्यास अनेकांना त्यांच्या शोकाकूल स्थितित आधार देवून ख्रिस्ताकडे आणू शकतो. म्हणून बायबल सांगते की, शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.
देवाला ‘आबा’ आणि ‘बापा’ म्हणून हांक मारतांना, स्वतःला देवाचे मूल म्हणवून घेतांना देवाच्या पावित्र्यासमोर माझे उणेपन मला जाणवावे व मी कष्टी व्हावे ही जाणीव यशयाला झाली होती (यशया ६:५). आंम्ही पश्चाताप करावा. येशू ख्रिस्ताने आपल्या कार्यास सुरवात केली तेंव्हा प्रथम संदेश जो दिला तो होता “पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” (मत्तय ४:१७, मार्क १:१५). पापामुळे आलेल्या मरणावस्थेसाठी शोक झाल्याशिवाय व्यक्ती पश्चाताप करीत नाही. व्यक्तीला शोक त्याचवेळी होतो जेंव्हा केवळ पाप काय आहे याचीच जाणीव न होता पापाचे अंतिम परीणाम, आणि पाप काय करू शकते याची जाणीव होते. वधस्तंभ आमच्यासाठी नेमकी हीच भुमिका पार पाडतो. वधस्तंभाकडे आमचे नेत्र लावल्यास ईश्वराने देवू केलेले अनंतकालिक जीवन आणि आम्ही ओढवून घेतलेले अविनाशी मरण यांची खरी ओळख होते. पापाच्या भीषण, रौद्र स्वरुपाची जाणीव करुन देणे हे वधस्तंभाचे कार्य आहे. हे रौद्र स्वरुप पाहिल्यानंतरच मनुष्य स्वत:च्या मरणासाठी शोक करतो. म्हणूनच जो मनुष्य स्वतःच्या पापाकरिता शोक करतो, तो धन्य.
पापाच्या परीणामांची जाणीव झाल्यावरच ख्रिस्ती जीवनाची सुरुवात होते. माझे देवाशी व येशू ख्रिस्ताशी असलेल्या नात्याचे पाप काय करते याच्या ज्ञानाने ज्या मनुष्याचे हृदय भग्न होवून जो शोक करतो त्याचे सांत्वन करण्याकरिताच (पॅराकॅलेव्ह) ख्रिस्त या भूतलावर आला. “हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस” (स्तोत्र ५१:१७). येशू ख्रिस्त शोक करणाऱ्यांस आश्रय देईल. त्यांच्या अपराधांची क्षमा करुन त्यांच्या पापावर पांघरुण घालून त्यांच्या हिशेबी अधर्माचा दोष लावणार नाही व ते धन्य होतील. (स्तोत्र ३२:१-२.) ही आशा फक्त ख्रिस्ताद्वारे आहे, त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, स्वत:ला मरणापासून तारावयास जो शक्तिमान त्याजजवळ मोठ्या आक्रोशानें व अश्रू गाळीत प्रार्धना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सुभक्तीमुळें ऐकण्यात आली. आपण सर्वांनी पाप केल्यामुळे आम्ही देवाच्या गौरवाला अंतरलो आहोत (रोम ३:२३). याकरिता कष्टी व्हा, शोक करा, रडा…प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांस उंच करील (याकोब ४:९-१७) व तुम्ही धन्य व्हाल.