विषय प्रवेश
प्रकटीकरणाचे पुस्तक समजून घेण्याकरिता आपण त्याचे तीन विभाग केले आहेत. या तीन विभागांमधून एकूण सात विषय सांगितले गेलेले आहे. ते खालील प्रमाणे:
१. स्वर्गीय ख्रिस्त काय व कसा आहे.
२. पाप पुरुषाचा उदय व त्याचे प्रशासन.
३. पाप पुरुषाच्या प्रशासनाने पृथ्वीवर होणारे परिणाम.
४. सैतानाचा पराभव व अंत.
५. पवित्र जन किंवा ख्रिस्ताच्या मंडळीची भावी स्थिती.
६. ख्रिस्ताने जे तयार ठेवले आहे ते नगर.
७. पापी जणांचा न्याय व अंत.
उत्पत्ती हे पवित्र शास्त्रातील पहिले पुस्तक असून प्रकटीकरण हे शेवटले पुस्तक आहे. उत्पत्तीचे पुस्तक ते प्रकटीकरणाचे पुस्तक ही पूर्णत्वाकडे वाटचाल आहे.
प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना खालील तक्ता कायमस्वरूपी लक्षात ठेवावा.

प्रकटीकरणाच्या पुस्तकातील सर्वच गोष्टींच आकलन आम्हाला होईल हे अशक्य प्राय आहे. बऱ्याच गोष्टी मानवी बुद्धीला अगम्य आहेत याची जाणीव योहानकृत शुभवर्तमान अध्याय १६:१२ वाचल्यानंतर येते. या ठिकाणी ख्रिस्त आपल्या शिष्यांशी बोलत असता म्हणतो की, “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.” अनेक लोक अर्थविवरणाबाबत गोंधळतात परंतु देव भक्तांना पवित्र आत्म्याद्वारे समज बुद्धी देतो. लूक कृत शुभवर्तमान अध्याय ८:१० मध्ये तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्य जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे; परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत; अशासाठी की त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.”
वरील दोन वचने लक्षात घेऊन प्रकटीकरणाचे पुस्तक आम्हास समजावे म्हणून नम्रपणे प्रार्थना पूर्वक देवाचे सहाय्य मागूयात.