Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /var/www/f58facbe-e340-461d-9060-4f8055190d53/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Thursday, January 8, 2026

लेंत किंवा उपवास समय

ख्रिस्ती बंधु-भगिनी, दर वर्षी लेंत किंवा उपवास समयांत प्रवेश करतात. आपण प्रथम लेंत समय निश्चित कसा केला जातो या बद्दलची माहिती घेवू. लेंत समयास राखेच्या बुधवार पासून सुरवात होते. परंतु राखेचा बुधवार कसा निश्चित केला जातो ?

मार्च महिन्याची २१ तारीख किंवा त्यानंतर असलेल्या पौर्णिमेनंतरचा रविवार हा ईस्टरचा रविवार असतो. त्याआधी असलेले सर्व रविवार सोडून चाळीस दिवस मागे मोजल्यानंतर चाळीसावा दिवस बुधवार येतो. तो राखेचा बुधवार होय. त्या दिवसापासून लेंत समय सुरु होतो. जर्मन भाषेमध्ये ‘लेंत’ साठी ‘लेंझ’ हा शब्द असून त्याचा अर्थ ‘वसंत ऋतु’ असा होतो. ऋतुचक्रात वसंत ऋतु जसा सृष्टीला प्रफुल्लित करतो, सर्वत्र बहर येवून सृष्टी अल्हाददायक व चैतन्यमय रुप धारण करते, त्याच प्रमाणे मानवी जीवनांत देव पित्याला प्रसन्न करणारे, नव चैतन्याने बहरलेले विलोभनीय रुप मानवाने धारण करावे हे आवश्यक आहे; म्हणजेच लेंत किंवा उपवास समय हा मानवी जीवनाचा अविभाज्य समय आहे.

वसंत ऋतुचे आगमन होण्यापूर्वी माळी झाडांची मशागत करतो. मशागत करीत असतांना ज्या फांद्या किंवा फाटे फलधारणा करु शकणार नाहीत, अथवा ज्या फांद्या, फाट्यांना रोगसंसर्ग, कीड आहे, अशा फांद्या तो छाटून टाकतो. ह्यात हेतू हा की, झाडाने उत्तम व अधिक प्रमाणात फलधारणा करावी. येशू म्हणतो, “माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणार प्रत्येक फाटा तो काढून टाकितो; आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करितो” (योहान १५:१,२). त्याच प्रमाणे लूक १३:६-९, मध्ये येशूने निष्फळ अंजिराच्या झाडाचा दृष्टांत सांगितला आहे. माळ्याच्या विनंतीमुळे निष्फळ अंजिराच्या झाडाला फलधारणेसाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला. वरील दोन्ही गोष्टींमध्ये माळी झाडाची निगा बाळगत आहे, झाडाला साफसूफ करीत आहे. त्याची विनंती मान्य करण्यात येत आहे, कालावधी देण्यात येत आहे. परंतु हे सर्व फलप्राप्तिच्या केवळ अपेक्षेनेच नव्हे तर अटीमुळे ग्राह्य धरण्यात आले आहे. झाडाने फळ द्यावे व तेही विपुल प्रमाणात द्यावे ही धन्याची इच्छा आहे. इच्छेची पूर्तता आवश्यक आहे. झाडांप्रमाणेच प्रत्येक मनुष्याला अंगभूत स्वभावाची साफसूफ करण्यासाठी काही समयाची आवश्यकता आहे व तो समय म्हणजेच लेंत समय.

प्रत्येक मानवाला जसे शारीरीक आरोग्य व स्वास्थ आवश्यक आहे तसेच आध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ्य नितांत गरजेचे आहे. आपल्या शारीरीक आरोग्यासाठी डॉक्टर्स आपल्याला शक्तिवर्धक टॉनिक देतात. आपण बलवान व निरोगी असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणूनच प्रत्येकजण आवडीने, न चुकता शक्तिवर्धके घेतो. आध्यात्मिक निरोगीपणासाठी आत्म्याची फळे (गलती ५:२४, २३) विपुल प्रमाणात यावीत म्हणून जे टॉनिक आम्ही घ्यायचे आहे ते म्हणजे देवाचे वचन. लेंत समयामध्ये देवाच्या वचनांद्वारे आम्ही आत्मिक पौष्टीकता धारण करुन देवाच्या कार्यासाठी अधिक बलसंपन्न व्हावे.

लेंत समय हिवाळ्यानंतर येतो. हिवाळ्यांत मनुष्य खाण्यापिण्याचा आस्वाद घेणे पसंत करतो. परिणामी आध्यात्मिक स्थुलता येण्याची शक्यता अधिक बळावते. पवित्र शास्त्रात हिवाळा भौतिक व दैहीक गोष्टींना महत्व देणारा व आध्यात्मिक आळस आणि स्थुलता दर्शविणारा ऋतु संबोधला आहे. म्हणूनच मत्तय २४:२० मध्ये ख्रिस्त म्हणतो, “तुमचे पलायन हिवाळ्यांत किंवा शब्बाथ दिवशी होवू नये म्हणून प्रार्थना करा.” पवित्र शास्त्रात हिवाळा संपल्यानंतरच मन प्रफुल्लित होण्याचा समय सांगितला आहे. गीतरत्न २:१०-१३ ही वचनें आपण आध्यात्मिक चिंतनाच्या दृष्टिकोनातून वाचू: “पाहा, हिवाळा गेला आहे, पाऊस संपून गेला आहे; पृथ्वीवर फुले दिसूं लागली आहेत; पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे; आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकूं येत आहे. अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीस फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे; माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल ये.”

या शास्त्रपाठात ‘समय’ आणि ‘होल्याचा शब्द’ यांचा उल्लेख आहे. हा समय वल्लभाला अपेक्षित असा आहे. होला पवित्रशास्त्रात शुद्ध पक्षी म्हणून उल्लेखलेला आहे. लेवीय १:१४ तसेच लूक २:२४ मध्ये येशू ख्रिस्ताच्या समर्पण विधि प्रसंगी “होल्याचा जोडा किंवा पारव्यांची पिल्ले” यांचा यज्ञ करावा… असे लिहिलेले आम्ही वाचतो. होल्याचा हा शब्द सुवार्तेचे संकेत आहेत. सुवार्ता आम्हास आध्यात्मिक आळसापासून दूर करते. म्हणूनच पवित्र शास्त्रांत, “सुवार्तिकाचे चरण हे मनोरम दिसतात असे म्हटले आहे.” यशया ५२:७… जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत विदित करितो, तारण जाहीर करितो, तुझा देव राज्य करीत आहे असे सीयोनेस म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरुन येतांना किती मनोरम दिसतात! या वचनांमध्ये सुवार्तिकाचे पाय येतांना म्हणजे नगरात प्रवेश करतांना मनोरम दिसतात कारण आत्मिक संजीवन त्या द्वारे येणार आहे म्हणून आनंदघोष करण्यास सांगितले आहे. जेंव्हा शिष्य पांगून गेले तेंव्हा ते वचनाची सुवार्ता सांगत फिरले. आणि फिलिप्पाने शोमरोन शहरी जाऊन त्यांस ख्रिस्ताची घोषणा केली तेंव्हा लोकसमुदायांनी ऐकून व फिलिप दाखवीत होता ती चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एकमताने लक्ष दिले. ज्यांस अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले; पुष्कळ पक्षघाती व पांगळी मनुष्ये बरी झाली; आणि त्या नगरांत फार आनंद झाला. (प्रे.कृ. ८: ४-८) या वचनांमध्ये फिलिप्पाचे सुवार्ताकार्य हे “होल्याचा शब्द” असे आहेत. त्या द्वारे लोक एकचित्त झाले, अशुद्धता दूर झाली, पंगुत्व निघून गेले. हा त्या शहराचा कायापालट आहे. हे ऋतुतिल बदल विदित करणारे कार्य आहे. हिवाळा संपल्याचे चिन्ह आहे. हे पुनरुज्जीवन म्हणजे आत्मिक फलधारणेचे चिन्ह आहे आणि ज्यावेळी हा बदल झाला त्यावेळी आपण वाचलेल्या गीतरत्न २:१३ मध्ये प्रियकर आपल्या प्रियतमेस भेटीस बोलावित आहे. आता तो तिला उठण्यास व बरोबर चालण्यास सांगत आहे. हा प्रियकर व त्याची प्रियतमा म्हणजे येशू ख्रिस्त व विश्वासनाऱ्यांची (संजीवनाने भरलेली) मंडळी यांचे चित्र आहे. जो पर्यंत आम्हामध्ये सुवार्ता, देवाचें वचन, आणि उपास यांच्याद्वारे आत्मपरिक्षणाचा व आध्यात्मिक उन्नतिचा बदल घडत नाही तो पर्यंत येशू आम्हाला जवळ कसा घेणार? जोपर्यंत आम्हामध्ये बदल होत नाहीं तो पर्यंत ख्रिस्त आमची भेट घेण्यास येणार नाही. हा बदल घडवून आणण्यासाठी उपास आवश्यक आहे. म्हणूनच उपास समयात कंठरव करण्यास सांगीतले आहे. “कंठरव कर, कसर करु नको; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर” (यशया ५८:१) त्याचप्रमाणे मनुष्याच्या जिवास पिडा व्हावी असा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? (यशया ५८:५). “तुम्ही रुदन केले तेंव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय? (जखऱ्या ७:५) या वचनांमधून हे स्पष्ट आहे की, आंम्ही आमच्या पातकांबद्दल खेदपूर्वक स्थितित जावे व आत्मपरिक्षण करावे. आम्हास पीडा जाणवावी. मुळात उपास या साठी हिब्रु भाषेत (जुन्या करारात) tsowm ‘सुम’ हा शब्द आहे व त्याचा अर्थ तोंड झाकणे किंवा तोंड बंद करणे असा होतो. या मध्ये अन्नासाठी तोंड झाकणे व अपशब्द, अनुचित वक्तव्य यासाठी तोंड बंद करणे हा अर्थ अद्याधृत आहे. म्हणजेच उपास समय हा सणाचा किंवा उत्सवाचा कालावधी नाही. हा कालावधी उत्साहाने खाण्यापिण्याचा नाही तर खेदपूर्वक, शोकग्रस्त होण्याचा आहे. तसेच नव्या करारात ग्रीक भाषेत ‘उपास’ यासाठी ‘नेस्टीओ’ हा शब्द असून त्याचा अर्थ अन्न वर्ज्य करणे असा आहे. थोडक्यात व स्पष्टपणे हे शब्द आंम्हास सांगतात की, जीव्हेची व शरीराची चंगळ करणाऱ्या अन्नपदार्थांपासून आम्ही दूर रहाणे अपेक्षित आहे. तोंड झाकणे, अन्नवर्ज्य करणे ही बंधणे आहेत व आंम्ही या बंधनांचे पालन करणे आहे. शरीराला व शारीरीक भावनांना म्हणजे राग, लोभ, मोह, द्वेश इ. यांना उत्तेजित व उद्दपित करणारे अन्नपदार्थ या समयात वर्ज्य करायचे आहेत. बरेच ख्रिस्ती लोक ठराविक पदार्थांचे सेवन दिवसभर करत असतात व तोच त्यांचा उपास सांगतात. आमचे उपास करणें हे आमचे भावविश्व नसावे तर देवाचे साम्राज्य असावे. तसेच बरेच ख्रिस्तीजण उपास सोडण्याच्या वेळी सायंकाळी मेजवानीचे आयोजन करतात आणि आपल्या मित्रगणांमध्ये उपास समयातील भोजनाचा कार्यक्रम ठरवतात, आणि उपास सोडण्यास स्नेहभोजनाचे स्वरुप देतात. संपूर्ण उपास समयात हीच गोष्ट खेदाची असते. बाकी ज्यासाठी खेद करायचा ते स्मरणातही नसते. जर स्नेह भोजनांचे नियोजन करायचे, मित्रांसमवेत पंक्तीभोजन करायचे तर जरुर करावे परंतु त्यासाठी उपास समयातच का या गोष्टी व्हाव्यात? उपासाचा कालावधी संपल्यानंतर मोशे, येशू ख्रिस्त, दावीद किंवा इस्त्राएली लोकांपैकी कोणी व्यक्ति, राजा, संदेष्टा यांनी मेजवानीचे कोणाला आमंत्रण दिलेले पवित्र बायबल मध्ये कोठेही लिहीलेले आढळत नाही. आपला वाढदिवस, मॅरेज ॲनीव्हरसरी, कामातील बढती यावेळी उत्तम पदार्थांनी मित्रजनांस तृप्त करावे. उपास ही साजरी करण्याची गोष्ट नाही, उपास समयात विवाहविधी होत नाहीत त्याचे हेच कारण आहे. मी उपास धरला असतांना *तिमुल्यांची* मापनसुत्रे माझी नसावीत तर देवाची असावीत. देव आम्हास तोंड बंद करण्यास (tsowm = सुम) सांगतो व आमचे तोंड उघडून ते भरवतोही तोच (स्तोत्र ८१:१०). आमच्या साठी मनमुराद अन्न खाण्याचा समयही देवाने निर्भर केला आहे (लेवीय २६:५). म्हणून उपासाचे पालन माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर… तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या (इफिस ५:१७ कृपया १५ ते २१ ही वचनें वाचावित). “तूं आपल्या दृष्टिने स्वत:स शहाणा समजू नको परमेश्वराचे भय धर… हे तुझ्या देहाला आरोग्य… सत्व असे होईल” (नीति ३:७,८). जर मला उपास समयानंतर आत्म्याच्या फळांनी फलद्रुप व्हायचे असेल तर… “आपणांसाठी धार्मिकतेची पेरणी करा… परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टि करावी याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे” (होशेय १०:१२).

ह्या लेखावरील चित्राचे स्पष्टिकरण:

हे चित्र सुनिल रणनवरे ह्यांनी रेखाटलेले आहे. या चित्रात स्त्री व पुरुष वृक्षाप्रमाणे दाखविले आहेत. त्यांचे पाय म्हणजे झाडाची खोलवर रुजलेली मुळं ते वचनात भक्कम रुजलेले आहेत याचे दर्शक आहे. या वृक्षाला अपेक्षेप्रमाणे फलधारणा झालेली दिसत आहे व या फलधारणेची सुवार्ता या वृक्षावर बसलेला होला विदीत करत आहे. ऋतुतील बदल रंग छटांद्वारे परमेश्वराला मिळणारी प्रसन्नता व्यक्त करतो.