Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /var/www/f58facbe-e340-461d-9060-4f8055190d53/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Friday, January 9, 2026
Uncategorized

रात्रंदिवस न्याहाळणारे डोळे!

जीवन आणि मरण ह्या दोनही बाबी परमेश्वराच्या हाती आहेत. जीवनाप्रती मानव सहसा सकारात्मक तर मरणाप्रती मानव नकारात्मक असतो. परंतु जीवन आणि मरण दोनही प्रती सकारात्मक राहात येते व राहिले पाहिजे हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो. त्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोण त्यांच्या ख्रिस्तानुयायित्वात सामावलेला होता. फिलिप्पैकरांस पत्र १:२१ मधील “मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे” ह्या पौलाच्या विधानामध्ये त्यांचे जीवनाबाबतचे तत्वज्ञान व्यक्त होते.

२००३ साली त्यांचे गॉलब्लॅडरचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन दरम्यान शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांकडून काही कापूस त्यांच्या पोटात राहिला. त्यामुळे त्यांची जखम चिघळली आणि त्यांची तब्येत एकदमच खालावली. डॉक्टरांनी आशा सोडली व आम्हालाही वडिल आता काही दिवसांचे सोबती आहेत हे सांगितले. आम्ही वडिलांना घरी घेऊन आलो. त्यांनाही कळले होते की आता आपण जास्त दिवस जगणार नाही. परंतु तरी सुद्धा ते मरणाला घाबरत नव्हते. कधी निराश झाले नाही व आम्हालाही निराश होऊ दिले नाही. उलट त्या दिवसांमध्ये त्यांचा विनोदी स्वभावाचा कळसच झाला. माझे वडिलबंधू सुद्धा डॉक्टरच आहेत. त्यांनी वडिलांना सलाईन लावले असता ते फार हळूहळू सुरू होते. माझे वडिल बंधुला म्हणाले की हे जरा फास्ट कर. बंधू म्हणाले हे फास्ट करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला रायगर येऊ शकतील. ते त्याला इंग्रजीत म्हणाले, “You are worried to make it FAST, but I am not worried even if it is my LAST.” मराठीत अनुवाद केला तर, “अरे ते तू घाबरतोयस करायला सलाईन फास्ट, पण मला काळजी नाही ते जरी झाले माझे लास्ट.” ही घटना, वडील प्रभूकडे जाण्याच्या आधिच्या रात्रीची आहे. मी त्यांना विचारले की ते अशा परिस्थितिमध्येही इतके विनोदी कसे काय असू शकतात? त्यांनी उत्तर दिले, “संजू (सुनिल), जेव्हां तू स्वत:च्या मरणाला हसू शकशील ना तेव्हां तू खरा ख्रिस्ती झाला असे समज.”

वडिलांच्या मित्राचा मुलगा एकदा त्यांना भेटायला आला. तो त्यांच्या विद्यार्थी सुद्धा होता त्यामुळे त्याचे वडिलांवर प्रेम होते. तो म्हणाला मी तुमच्यासाठी औषध आणायला जातो. आणि तो दोन दिवसांनंतर परत आला व माझ्या वडिलांना म्हणाला सर तुम्ही हे औषध घ्या म्हणजे तुम्ही अजून दहा वर्ष जगाल. माझ्या वडिलांनी त्याला विचारले की हे औषध कोणी दिले. त्याने सांगितले की ते एका महाराजाकडून आणलेले आहे. माझे वडिल त्याला म्हणाले की त्या महाराजाने मला बघितले सुद्धा नाही आणि त्याला माझा आजार कसा काय माहीत. त्यावर विद्यार्थी म्हणाला सर ते महाराज महान असून त्यांना सिद्धी प्राप्त आहे. माझे वडिल म्हणाले ज्या माणसाने मला पाहिले सुद्धा नाही त्याच्या औषधाने मी दहा वर्ष जगावे ह्या पेक्षा जो माझा देव मला दिवसरात्र न्याहाळतो त्याच्याजवळ मी चटकन जाऊन अनंतकाळ राहाण्याचे निवडेन. मग मला जवळ बोलावून त्यांनी ते औषध दूर कुठेतरी फेकून यायला सांगितले. मी परत आल्यावर मला योहान १०:४-५ उघडून वाचायला सांगितले. त्यात लिहिले आहे, “तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत.” ते वाचल्यावर ते मला म्हणाले आपला मेंढपाळ येशू आपल्याला बोलावतो आहे, दुसर्‍यांच्या मागे जायचे नाही म्हणजे नाही!

ह्यामुळे माझा स्मृतिभ्रंष जरी झाला तरी मी हे वचन विसरणार नाही.

मी आज मरणाकडेही सकारात्मकतेने बघू शकतो. येशू ख्रिस्तात मला प्राप्त झालेल्या व साक्षात पुढे प्राप्त होणार्‍या सार्वकालिकतेवर माझ्या वडिलांप्रमाणेच माझाही ठाम विश्वास आहे. येशू सोबत असणे हे काही औरच असणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *