येशूचे बलिदान व पुनरुत्थान

लेंत समय पूर्ण होवून आपण उत्तम शुक्रवार आणि पुनरुत्थानाचा सण यांचे धार्मिक दृष्ट्या पालन करतो. उत्तम शुक्रवार म्हटले म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानें आम्हा सर्वांच्या तारणासाठी देवपित्याच्या इच्छेनुसार स्विकारलेलें वधस्तंभावरील मरण आणि वधस्तंभावर वाहिलेले त्याचे रक्त याचे महात्म्य व स्मरण. त्याच प्रमाणे पुनरुत्थान म्हणजे त्याचे मरणातून पुन्हा उठणे, मरणावर विजय मिळवून पुनः जिवंत होणे व अखील मानव जातीला त्याद्वारे मिळालेले सार्वकालिक जीवन. या दोन्ही गोष्टींवर चिंतन करीत असतांना जे विचार मनात येतात ते म्हणजे ख्रिस्ताचे वधस्तंभावर खिळून मरण स्विकारणें व त्या आधी कल्पनातीत हाल, कुचेष्टा सहन करणे हे खरोखर आवश्यक होते का? ख्रिस्ताला जसे काही वेळ वाटले की, “हा प्याला त्याजपासून टळला जावा” तसा तो प्याला, तो प्रसंग, त्याचे वधस्तंभावरील मरण, देवपिता टाळू शकत नव्हता का? किंवा देवपित्याने तसे होणे का टाळले नाहीं? ख्रिस्ताचे वधस्तंभावर रक्तवाहणे इतके आवश्यक का होते? पापविमोचनासाठी रक्तच का? येशू ख्रिस्त वधस्तंभा ऐवजी वेगळ्या प्रकारे मारला जावू शकत नव्हता का? दुसरा पर्याय किंवा पद्धती देवाने का स्विकारली नाही की, जी आपल्या कल्पनांपैकी असू शकते? देवपिता न्यायी आहे व न्यायाच्या बाबतीत तो तडजोड करीत नाही. पवित्र शास्त्र सांगते, “तो दूर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे” (अनु. ३२:४). म्हणूनच देवाने मानवाच्या तारणासाठी केलेली योजना ही विश्वसनीय, न्यायी व सरळ होती. देवपिता न्यायाच्या बाबतीत व लावून दिलेल्या नियमांबाबत तडजोड करीत नाहीं. म्हणूनच येशूचें वधस्तंभावरील मरण व त्याचे वाहणारे रक्त या शिवाय इतर दुसरा मार्ग किंवा योजना असूच शकत नव्हती. पित्याने न्यायाची अंमलबजावणी करताना आपल्या पुत्राच्या बाबतीतही तडजोड केली नाही. आम्हाला माहीतच आहे कीं, रक्तसिंचनावाचून पाप विमोचन नाहीं. व शुद्धिकरणासाठी रक्त आवश्यक आहे. नियम शास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्वकाही शुद्ध होते, आणि रक्त ओतल्यावाचून पाप क्षमा होत नाही (इब्री ९:२२). अधिक स्पष्टीकरणासाठी आपण लेवीय १७:११ या वचनावर विचार केंद्रित करू, “शरीराचे जीवन तर रक्तात असतें, आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तांत जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते.” तसेच वचन १४ मध्ये लिहीले आहे की, “कारण प्राणिमात्रांच्या जीवनाबद्दल म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय.” एक गोष्ट निश्चित आहे की, प्रायश्चित्तासाठी जो पशू वधला जायचा तो प्रायश्चित्त करणाऱ्या (पापी व्यक्ति) ऐवजी वधला जायचा. व्यक्तिसाठी असलेली शिक्षा ही त्या पशुला होत असे. हा नियम व हा पर्याय दैवी योजनेचे स्पष्टीकरण होते की, माझ्या ऐवजी माझ्या पापांबद्दल कोणी दुसरा (म्हणजेच येशू ख्रिस्त) वधला जाणार आहे. जीवा बद्दल जीव वधला जाणार आहे. रक्तात जीव, जीवन आहे म्हणून रक्त वाहणे हे अपरिहार्य होते. याला पर्याय नव्हता. म्हणून येशूच्या पवित्र रक्तानेच आमचे पापक्षालन होणार होते. रक्त हा शरीरातील एकमेव असा घटक आहे की, तो प्रवाही आहे. त्याचे अभिसरण होते. तसेच शरीरातील प्रत्येक पेशी, मग ती कोणत्याही स्नायुची, हाडांची अथवा अवयवांची असो, ती जीवंत व कार्यक्षम राहण्यासाठी रक्तच पाहिजे. रक्ताशिवाय शरीराला जीवन नाही शरीरात सर्व अवयव असले परंतु रक्त नसले तर त्या सर्व अवयवांसह शरीर मृत आहे.
अतिशय एकचित्त आणि मग्न होऊन आपण पुढील मुद्यावर चिंतन करु. येशूनें म्हटले, “अरण्यात मोशेने जसा सर्प उंच केला तसे मनुष्याच्या पुत्राला उंच केल्या शिवाय त्याचें गौरव होणार नाही” (योहान ३:१४). या ठिकाणी येशूची सर्पाबरोबरची केलेली तुलना आम्हास थोडा विचार करण्यास भाग पाडते. तसेच सर्प म्हणजे येशू ही कल्पना विरोधाभासात्मक वाटते. याबद्दल आपण परमेश्वराने घडवून आणलेल्या इतिहासाला उजाळा देऊ…इस्त्राएल लोक परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध बोलले, “तेंव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठविले; त्यांच्या दंशाने इस्त्राएलातील बरेच लोक मेले…तेंव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करुन ध्वजस्तंभाला टांग. सर्पदंश झालेल्या कोण्या माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेंव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे” (गणना २१:६-९). या ठिकाणी देवाने मोशेच्या काठीची किंवा कबुतराची अथवा इतर कशाचीही प्रतिमा करण्यास सांगितले नाही तर सापाचीच प्रतिमा करण्यास सांगितले. कारण हे की, काट्याने काटा काढायचा. लोहेको लोहा काटता है. सापापासून वाचायचे तर सापाचीच प्रतिमा पाहिजे. सापाने जर मृत्यु आला तर सापाद्वारे जीवनही प्रस्थापित करण्यात आले. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. सैतानाने आदाम हवा कडून आज्ञाभंगाचें पातक घडवून देवाच्या प्रतिमेचे असलेल्या मानवी देहावर मृत्यु हा शाप आणला. मानवी देह पुनः शुद्ध करुन त्याला अविनाशी जीवन देणे आता आवश्यक होते. म्हणून आता मानवी शरीर जर मरत आहे तर त्याला तारावयासही मानवी देहच पाहिजे होता. सापासाठी जर साप तर देहासाठी देह म्हणून येशू ख्रिस्ताला मानवी देहात जन्म घेऊन यावे लागले. “शब्द देही झाला” यास्तव इब्री लोकांस पत्र अध्याय १०:५ मध्ये म्हटले आहे, “तूं माझ्यासाठी शरीर तयार केले” म्हणून येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला जाणे अगत्याचे होते. देवपित्याच्या या योजनेची येशू ख्रिस्ताला पूर्ण जाणीव होती. आणि हीच दैवी योजना आपल्या शिष्यांना समजलीच पाहिजे म्हणून येशू ख्रिस्त त्यांना वारंवार सांगत होता की, “मनुष्याच्या पुत्राने फार दुःख भोगावें, वडिल मंडळ, मुख्य याजक व शास्त्री यांजकडून नाकारिले जाऊन जिवे मारले जावें, आणि त्याने तीन दिवसांनंतर पुनः उठावे, याचें अगत्य आहे” (मार्क ८:३१, ९:३१) त्याच प्रमाणे मार्क १०:३३, १०:३८, १०:४५, १४:२५ या प्रकारे आपल्या संभाषणातून एकूण सहा वेळेस आपल्या शिष्यांना येशू त्याचा वधस्तंभावरील मृत्यु आगत्याचा आहे असे सांगत असल्याचे मार्ककृत शुभवर्तमानांत आढळते. ही देवाची मर्जी म्हणजे पूर्ण इच्छेस उतरलेले तत्व होते. “त्याला ठेचावें असे परमेश्वराच्या मर्जीस आले…त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल” (यशया ५३:१०). ही देवाची केवळ इच्छाच नव्हे तर त्याद्वारे तारणाची योजना पूर्ण करणे यामध्येच ख्रिस्ताच्या जीवनाची सार्थकता होती म्हणून तो म्हणतो, “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धिस न्यावे हेच माझे अन्न आहे. आतापर्यंत आपण पाहिले की, सापासाठी साप, देहासाठी देह तर मृत्युसाठी मृत्यु असे होणे आवश्यक होते. परंतु मारणाऱ्या मृत्युसाठी तारणारा, मरण देणाऱ्या मृत्युसाठी जीवन देणारा मृत्यु अगत्याचा होता व तो मृत्यु होता येशू ख्रिस्ताचा. सैतानाला देवाची ही योजना पक्की समजून उमजली होती. येशू ख्रिस्ताच्या मृत्युद्वारे सैतानाला त्याचा स्वत:चा दारुण पराभव व शेवट स्पष्ट दिसत होता. यामुळेच ख्रिस्ताचे वधस्तंभावर मरण होवू नये म्हणून सैतान एकसारखे प्रयत्न करत होता. प्रथम त्याने पेत्राद्वारे हा प्रयत्न केला पेत्र त्याला (येशूला) त्याचा निषेध करुन म्हणाला, “आपणावर दया असो, असे आपणाला होणारच नाही” (मत्तय १६:२२). परंतु येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस.” दुसऱ्यांदा जनसमुदायांतून सैतानाने हा प्रयत्न केला, “तू आपला बचाव कर; तूं देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरुन खाली ये” (मत्तय २७:४०). वधस्तंभावर खिळलेल्या दोन अपराध्यांपैकी एकाकडून सैतानाने हा प्रयत्न केला. “एकाने त्याची निंदा करुन म्हटलें, तू ख्रिस्त आहेस नां? तर स्वत:चा व आमचा बचाव कर” (लूक २३:३९). वधस्तंभाजवळ उभे असलेल्या अधिकाऱ्यांकडूनही सैतानानें हा प्रयत्न केला. तेही म्हणाले, “त्याने दुसऱ्यांस तारिले, जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वत:चा बचाव करावा.” शिपायांनीही म्हटले, “तूं यहूद्यांचा राजा असल्यास स्वत:चा बचाव कर” (लूक २३:३५-३७). परंतु ख्रिस्त वधस्तंभावरुन खाली उतरला नाही. वास्तविक त्याला ते सहज शक्य होते. पापामुळे जर मनुष्य मारला जात होता तर पाप मारले जाणे आवश्यक होते. “पापाचे वेतन मरण आहे (रोम ६:२३). येशू ख्रिस्ताला मरण आले कारण ते पापाचे वेतन आहे. मग प्रश्न उभा राहतो की, ख्रिस्त पापी होता का? ख्रिस्त पापी नव्हता तर माझे पाप त्याजवर लादण्यात आले. आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादीले (यशया ५३:६). ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले. (२ करिंथ ५:२१), आणि आमच्या देवाजवळ पक्षपात नाहीं (रोम २:११). मानवावरील प्रीति व पुत्रावरील न्याय याचे चिन्ह वधस्तंभ होता. वधस्तंभावर मानवाला मिळणारी शांति व देवपित्याचा पुत्रावरील न्याय यांची सत्यता एकत्र झाली. न्यायत्व व शांति यांनी एकमेकांचें चुंबन घेतले (स्तोत्र ८५:१०). ख्रिस्त वधस्तंभावर मेला म्हणून मला खात्री आहे की, माझे पाप वधस्तंभावर मारले गेले. आपण सुरवातीला पाहिलेच आहे की, देवपिता म्हणतो, “रक्त हे मी तुम्हाला वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी दिले आहे.” म्हणजेच हे रक्त वेदीवर वाहणे आवश्यक होते म्हणून वधस्तंभ ही देवपित्याने अर्पण स्विकारलेली शेवटची वेदी होय. “आता यापुढे ख्रिस्त मरत नाहीं; त्याजवर पुढे मरणाची सत्ता नाही…. तो पापाला एकदाच मेला” (रोम ६:९-१०). म्हणून आता आम्ही पाप करु नये, कारण “पापांबद्दल यापुढें यज्ञ व्हावयाचा राहिला नाहीं” (इब्री १०:२६). “ख्रिस्त… एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांच्या तारणासाठी पापविरहीत असा दुसऱ्यानें दिसेल” (इब्री ९:२८).
पुनरुत्थान दिनाविषयी आपण पुढील मुद्यांवर विचार करु. आजतागायत अगदी आमच्या बालपणापासून आम्ही ऐकले आहे कीं, पुनरुत्थित येशूचे प्रथम दर्शन होणारी व्यक्ति म्हणजे मरीया मग्दालिया. पुनरुत्थाना बाबत पवित्रशास्त्रातील मत्तय २८, मार्क १६, लूक २४ आणि योहान २० हे अध्याय अभ्यासल्यास असे समजते की, मरीया मग्दालिया कबरेजवळ आली त्यावेळी कबरेच्या तोंडावरुन धोंड काढली आहे असे तिने पाहिले (योहान २०:१). “त्या सुगंधी द्रव्ये घेऊन कबरेजवळ आल्या तेंव्हा कबरेवरुन धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आंत गेल्यावर त्यांना येशूचे शरीर सापडले नाहीं” (लूक २४:२-३). “त्या कबरेजवळ आल्या. त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले; ती तर फारच मोठी होती” (मार्क १६:२,४). ज्या येशूचा शोध तुम्ही करीत आहां, “तो येथे नाही कारण त्याने सांगितले होते त्याप्रमाणे तो उठला आहे” (मत्तय २८:५-६). “तो येथे नाही” (मार्क १६:६). या वचनांवरुन हा अर्थबोध होतो की, येशू, मरीया मग्दालियाला कबरे पासून कांही अंतरावर भेटला आहे (मत्तय २८:८). मार्क १६:९ मध्ये येशूने मरीया मग्दालिया हीस दर्शन दिल्याचे म्हटले आहे, परंतु स्थळाचा उल्लेख नाही. योहानकृत शुभवर्तमानातही २०:१-१० या वचनांमधील घटना घडल्या नंतर मरीयेने येशूला पाहिले आहे. तीन गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतात. १) ज्यावेळी मरीया मग्दालिया कबरेजवळ आली त्यावेळी कबर उघडली गेली होती, २) कबरेवरील धोंड लोटलेली होती, ३) येशूचे शरीर कबरेत नव्हते. कारण मरीया तेथे पोहोचण्याआधीच त्याचे पुनरुत्थान झाले होते. म्हणजेच याआधीच तो पुनरुत्थीत झाल्याचे कोणीतरी पाहिले असल्याची दाट शक्यता आहे.
आपण थोडे मागे जावून या घटनेची पार्श्वभुमी समजून घेऊ. मुख्य याजक व परुशी यांनी पिलाताला तिसऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आणि पिलाताने म्हटले, “तुमच्या जवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तितका चोख बंदोबस्त करा.” त्यांनी पहारेकरी बरोबर घेऊन धोंडेवर रोमन सरकारची मोहर लावून शिक्कामोर्तब करुन कबरेचा बंदोबस्त केला. हा वृत्तांत मत्तय २७:६२-६६ मध्ये आहे.
रोमन पहारा शंभर ते सहाशे सैनिकांचा असे म्हणजे येशूच्या कबरेभोवती कमीत कमी शंभर हत्यारबंद शिपाई तैनात करण्यात आले होते. धोंड शिक्तिामोर्तब केली यासाठी मुळशब्द आहे. ‘स्फ्रॅगइडझो’ म्हणजे राजमुद्रा लावणे. याचा अर्थ हा होतो की, कबरेवरील धोंड जर उघडायची तर रोमन राजमुद्रा तोडावी लागणार, विनापरवानगी राजमुद्रा तोडल्यास मृत्युदंड ही शिक्षा होती. पहाऱ्याची जागा पहारेकऱ्याने सोडल्यास व ज्या गोष्टीचा तो पहारा करीत आहे ती गोष्ट चोरीला गेल्यासही मृत्युदंड हीच शिक्षा होती. जर एका मृत देहाची, एका प्रेताची रक्षा करण्यासाठी कमीत कमी शंभर शिपायी पहाऱ्यासाठी ठेवून सतर्कता दाखविण्यात येते तर येशूचे अकरा शिष्य जीवंत होते. त्यांच्या बाबत किती सतर्कता बाळगण्यात आली असणार? भुमिकंप झाला याचे कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे (मत्तय २८:२). मूळ ग्रीक बायबल मध्ये ‘गार’ हा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ होतो मूळ कारण, त्याचा परीणाम म्हणजेच प्रभूचा दूत स्वर्गातून उतरल्यामुळे भुमिकंप झाला. त्यावळी पहारेकरी (‘तैरीओ’ रक्षकांचा मोठा समूह) त्याच्या (म्हणजे देवतूताच्या) भयाने थरथर कापले. ‘कापला’ असे लिहिले नाही तर ‘कापले’ म्हणजे अनेक वचन आहे (मत्तय २८:४). पहारेकऱ्यांतील कित्येकांनी (‘टिस’ = खूप, अनेक) नगरात जाऊन झालले सर्व वर्तमान मुख्य याजकांस सांगितले (मत्तय २८:११). मरीया मग्दालिया व इतर स्त्रीयांच्या आधी पहारेकऱ्यांनी दुताला धोंड लोटताना व येशूला कबरेबाहेर जीवंत येताना पाहिले, असा अर्थबोध होतो. त्यांनी हे वर्तमान रोमी अधिकाऱ्यांना न सांगता याजकांना सांगितले. कारण ही घटना आत्मिक व आध्यात्मिक होती. धर्मगुरूच याचे स्पष्टीकरण देऊ शकत होते. दुसरे असे की, रोमी अधिकाऱ्यांनी त्यांना निश्चये जीवे मारले असते. (१) त्यांनी पहाऱ्याची जागा सोडली होती (२) व ते रक्षण करीत असलेले मृत शरीर आता त्या ठिकाणी नव्हते. “येशु उठला आहे” हे शुभवर्तमान येशूचे शिष्य, आप्तजन, अनुयायी यांचे आधी रोमी पहारेकऱ्यांनीच सांगितले. ही देवाची रीत आहे. शिष्यांनी किंवा अनुयायांनी पुनरुत्थानाची घोषणा केली असती तर विरोधकांनी त्यांना हेच म्हटले असते की, तुम्ही त्याचेच शिष्य आहात, तेंव्हा तुम्ही तसे म्हणणारच. परंतु याला पुरावा काय? म्हणून ज्यांना सत्य सांगणे बंधनकारक होते, ज्यांना खोटे बोलल्यास मृत्यु ही शिक्षा होती अशा रोमी पहारेकऱ्यांकडूनच देवाने येशूचे पुनरुत्थान वदवून घेतले. येशूला ज्यांनी जीवे मारले, जे येशूच्या मृत देहाचे साक्षीदार होते तेच लोक येशूचे सदेह जीवंत होण्याचे व त्याच्या मृत्युवरील विजयाचे साक्षीदार झाले. आपणही त्या पुनरुत्थित येशूची घोषणा करु. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे!