प्रस्तावना – प्रकटीकरण
ग्रीक भाषेतील अॅपॉकॅलिप्स या शब्दाचे मराठीतील भाषांतर प्रकटीकरण असे केले आहे. अॅपो म्हणजे प्रकट करणे व कॅलिप्तो म्हणजे मोहर बंद असणे, किंवा मुद्रांकित केलेले, की जे लोकांपासून झाकून ठेवलेल्या अवस्थेत आहे. ते सर्वांना समजावण्यासाठी कोणीतरी त्यावरील झाकण किंवा पडदा दूर करणे गरजेचे आहे. एखाद्या भेट वस्तूचा बॉक्स आकर्षक वेष्टणांनी झाकलेला असतो, त्यामध्ये निश्चित काय भेट आहे ते ती वेष्टणे काढल्याशिवाय व तो बॉक्स पूर्णपणे उघडल्याशिवाय समजत नाही. तोपर्यंत जी असते ती म्हणजे उत्सुकता…जसे की लुक अध्याय २ वचन ३० व ३२ मध्ये शिमोन म्हणतो की, “कारण परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड…ते मी आपल्या डोळ्यांनी पाहिले”. संत पौल गलतीकरांच्या पत्रात अध्याय १:१२ मध्ये लिहितो की, सुवार्ता “मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही, आणि ती मला कोणी शिकवलीही नाही; तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.” जुन्या करारातील दानीएल, यशया, योएल व इतर संदेशष्ट्यांनी लिहून ठेवलेल्या भावी गोष्टींची पूर्तता कशाप्रकारे होणार हे प्रकटीकरणाचे पुस्तक अभ्यासल्यानंतर समजण्यास अधिक सुलभ होते.
दानीएलच्या पुस्तकात, देवाने होणाऱ्या घटना दृष्टांताच्या द्वारे आधीच सांगितल्या होत्या व त्या सांगितलेल्या क्रमानुसार घडत गेल्या. या पुस्तकांमधून दृष्टांतांचा रोख हा अंतसमयाकडे किंवा शेवटाकडे आहे. त्यापैकी काही घटनांची पूर्तता दानीएलाने वर्तमानात प्रत्त्यक्ष घडताना पाहिली. जसे की बाबीलोन येथे बंदीवासात जाणे, जगावर राज्य करणारी तीन राष्ट्र. परंतु त्याला देवाचे लोक, इस्राएल राष्ट्र याचे निश्चित काय होणार याबद्दल कायम उत्सुकता राहिली.
प्रकटीकरणाच्या पुस्तकाची रचना समजण्यास त्याचे तीन विभाग करून अध्ययन करणे सोपे जाईल.
या तीन विभागांचा उल्लेख पहिल्या अध्यायाच्या एकोनिसाव्या वचनात आढळतो १) “जे तू पाहिले”, २) “जे आहे” व, ३) “या नंतर जे होणार”.
अध्याय एक हा विभाग एक विषयी म्हणजे “जे तु पहिले” या बद्दल आहे. या मध्ये पुनरुत्थित व गौरवी येशू ख्रिस्त मंडळीचा वर व स्वामी याचे वर्णन आहे. तो कसा होता, कसा दिसला, त्याचे स्वरूप कसे होते या विषयी सांगितले आहे. हा दृष्टांत जेव्हा संपला तेव्हा तो भूतकाळ झाला. जसे की आपण जे स्वप्न पाहतो ते जाग आल्यानंतर भूतकाळात जाते. म्हणून “जे तू पाहिले” हा विषय भूतकालात्मक आहे.
अध्याय दोन व तीन हे विभाग दुसरा म्हणजे “जे आहे” याविषयी आहेत. यामध्ये वर्तमानकालीन तपशील आहे. अर्थात त्या काळातील मंडळ्यांची स्थिती वर्णिलेली आहे.
अध्याय चार ते बाविस. या मध्ये विभाग तिसरा म्हणजे “या नंतर जे होणार” त्या विषयी सांगितले आहे. अर्थात भविष्यकालीन स्थिती आहे. या प्रकारे भूतकाळ, वर्तमानकाळ, व भविष्यकाळ याविषयी प्रकटीकरणाचे पुस्तक आहे. हे पुस्तक साधारण इ.स. ९५ मध्ये लिहिले गेले असे पवित्र शास्त्र अभ्यासकांचे मत आहे. दानीएल चे पुस्तक व प्रकटीकरणाचे पुस्तक लोकांनी वाचू नये व ते त्यांना समजू नये यासाठी सैतान निरंतर कार्यशील आहे. कारण या पुस्तकांद्वारे नीतिमानांना अविनाशी जीवन व सैतानाचा अंत याविषयी सांगितलेले आहे. या पुस्तकात सैतानाचा पराभव आहे. हे पुस्तक प्रार्थनापूर्वक समजून घेतल्यास सात्विक व समर्पित जीवन जगण्यास आत्मिक प्रेरणा मिळते.