प्रकटीकरण – अध्याय १
प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या पहिल्याच अध्यायाचे पहिले वाक्य ‘येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण’ असे आहे. योहानाला येशू ख्रिस्ताचा जो दृष्टांत रुपी साक्षात्कार झाला त्यामध्ये येशूचे दिव्य स्वरूप प्रत्यक्षात दिसते आहे. तो राजांचा राजा आहे व तो लवकरच येणार आहे. त्याच्या येण्याचे तीन हेतू आहेत:
१. विश्वासू जणांची सुटका करण्यास,
२. दुष्टांचा न्याय करण्यास, व
३. पृथ्वी देवाच्या इच्छेस अंकित करण्यास.
हे प्रकटीकरण देवाने दूताला पाठवून योहानास कळविले आहे. या गोष्टींचा उलगडा मानवास व्हावा याची देवाला गरज भासली कारण हे लवकर झाले पाहिजे. ही आम्हासाठी दखल घेण्याची सूचना आहे. आम्ही हे वाचलेच पाहिजे कारण हे देवापासून आहे. पहिलेच वचन सांगते की हे देवाच्या वचनाविषयी व ख्रिस्ताविषयी साक्ष म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयीची साक्ष आहे. यामध्ये आणखी एक बाब सुस्पष्ट केली आहे ती म्हणजे, ‘कारण समय जवळ आला आहे.’ याचा साधा, सोपा व सरळ अर्थ हा आहे की या गोष्टी पूर्णत्वास जाण्याची वेळ आली आहे.
तिसरे वचन सांगते की ‘या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा.’ हे तृतीय पुरुषी एक वचनी संबोधन आहे. ही एकच व्यक्ती आहे की ज्याच्याद्वारे लोक त्याने वाचन केलेले ऐकतील व त्याप्रमाणे आचरण करतील. यास्तव वाचून दाखविणारा इतरांसाठी आशीर्वादाचे कारण आहे. ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य आहेत. धन्य या शब्दासाठी ग्रीक मध्ये ‘आशेर’ हा शब्द वापरला आहे. मराठी अनुवादामध्ये त्यासाठी अभिनंदन किंवा आशीर्वादित हा शब्द सुद्धा वापरला आहे. ख्रिस्त त्यांना आशीर्वादित असे संबोधून त्यांचे अभिनंदन करीत आहे कारण समय जवळ आला आहे. तो समय कधीही अकस्मात येऊ शकतो. लवकर होणे यासाठी मूळ भाषेत ‘एनतकाई’ हा शब्द वापरला आहे व या शब्दापासूनच ‘टॅकोमीटर’ म्हणजे गतिमापक हा शब्द आलेला आहे. या घटना कधी घडतील हे सुनिश्चित नाही परंतु एकदा घटनाक्रम सुरू झाला की मग त्या एकापाठोपाठ होत राहतील. वर्तवलेली भविष्य आज परिपक्व झालेली आणि पूर्णत्वाकडे वाटचाल होताना दिसत आहेत; जसे की मणिपूर मधील वांशिक युद्ध, इस्राएल वर होणारे हल्ले, अणुयुद्ध, रशिया व युक्रेन यांचे वैर, इत्यादी. स्वतः ख्रिस्त हे सांगतो आहे म्हणजे दृष्टांत रूपाने सांगितलेल्या गोष्टी पूर्णत्वास जाणारच जाणार. आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात अशी आमची इच्छा असते त्या पूर्णत्वास जाव्यात म्हणून आम्ही नेहमीच तयारी करत असतो. तत्सम याही गोष्टी पूर्णत्वाकडे वाटचाल करत असताना आम्ही सदोदित तयार असले पाहिजे. देवाचीही तीच इच्छा आहे.
पुष्कळ जणांना प्रकटीकरणाचे पुस्तक वाचताना भीती वाटते परंतु ख्रिस्ताच्या इच्छेला समर्पित असलेल्यांना मात्र आनंद होतो. कारण या भविष्याची सांगता आनंदात आहे. तो आनंद म्हणजे सार्वकालिक जीवन. ख्रिस्त आम्हाला दर्शवित आहे, प्रकट करतो आहे कारण ते बंदिस्त किंवा झाकलेले राहू नये ही त्याची इच्छा आहे. नव्या करारात ‘प्रकट करणे’ हा शब्द १८ वेळेस आला आहे. या पुस्तकाचा सार म्हणजे देवाचा सैताना वरील विजय, सैतानाचा व पापाचा अंत आणि नीतिमानांना सार्वकालिक जीवन हा आहे.
ख्रिस्ताची त्याच्या मंडळी विषयी असलेली आस्था तो वेगवेगळ्या सात मंडळांना पत्राद्वारे कळवीत आहे. पवित्र शास्त्रात सात हा पूर्णत्वाचा अंक आहे. सात हा सर्व समावेशक अंक आहे त्यातून काहीही व कोणीही सुटणार नाही. या सात मंडळ्यांमध्ये जगातील सर्व मंडळ्या सामावल्या आहेत. सात हा अंक प्रकटीकरणाच्या पुस्तकात वारंवार आलेला आहे. जसे की सात मंडळ्या, सात आत्मे, सात शिक्के, सात कर्णे, सात वाट्या. प्रत्येक मंडळी या सात मंडळ्यांपैकी एकीसारखी आहे. सर्व मंडळ्यांनी आम्ही यापैकी कोणत्या प्रकारात बसतो याचे स्वपरिक्षण करायचे आहे. ज्याच्याकडून हे पत्र आहे तो जो आहे, होता व येणार त्याच पासून; म्हणजे या ठिकाणी ख्रिस्ताचे सार्वकालिकत्व सांगितले आहे. तो कालगणना सुरू होण्यापूर्वी अस्तित्वात होता, अस्तित्वात आहे व तो युगांती येणार आहे. त्याच्या राजासणासमोर सात आत्मे आहेत. या ठिकाणी पुन्हा सात हा अंक पूर्णत्वाचा निर्देश करतो आहे. राजासन त्याचा राजाधिकार दाखविते तो राजांचा राजा आहे.