Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /var/www/f58facbe-e340-461d-9060-4f8055190d53/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Thursday, January 8, 2026

नाताळाशी संबंधीत शहरे!

नाताळ किंवा ख्रिस्तजन्मोत्सव साजरा करतांना प्रामुख्यानें आपले विचार केंद्रित करावेत अशी गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताने भूतलावर कुमारीकेच्या उदरी मानवी देहात जन्म घेणे. मानवाला पापाच्या बंधनातून अर्थात सैतानाच्या दास्यातून मुक्त करून तारण प्राप्ती करुन देण्यासाठी देवानेच ही योजना केली होती. ही योजना दैवी असल्यामुळे येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवरील जन्मस्थळ, त्याचे बालपण जेथे जाणार ते स्थळ, त्याचा दैवी कार्यारंभ होणार ते स्थळ व त्याच्या आयुष्यातील विशेष अर्थपूर्ण घटना ज्या ठिकाणी घडणार अशा सर्व भूभागांना, गावांना, स्थळांना जी नांवे आहेत ती सुद्धा दैवी गूढ संकल्पांशी नाते सांगून भविष्यकालीन घटनांची उकल देणारी आहेत. किंबहुना या मुळेच केवळ ही स्थळेंच नव्हे तर त्यांचा अर्थही रम्य आहे.

येशू ख्रिस्ताच्या भूतलावरील कार्यात म्हणजेच मानवाच्या तारणाच्या दैवी योजनेत ज्या स्थळांचा पवित्र बायबलमध्ये वारंवार उल्लेख होतो ती स्थळें म्हणजे यरुशलेम, बेथलहेम, नासरेथ, गालील व यार्देन या स्थळांच्या नावाचा आणि दैवी योजनेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न या आध्यात्मिक चिंतनाद्वारे करू.

येशू ख्रिस्ताचा जन्म यहुदा प्रांतातील बेथलहेम या गावी झाला. हे गांव ‘यरूशलेम’ या राजधानीच्या शहरापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर होते. येशू ख्रिस्ताच्या जीवनातील उत्तर कालावधी हा या शहरातच व्यथित झाला आहे. याच शहरात देवाचें पवित्र मंदिर होते जिंथे देवाची उपासना व पाप क्षमेसाठी अर्पण दिली जात असत. यरूशलेम शहराच्या वेस बाहेरच येशू ख्रिस्ताने मानवाच्या पापक्षमे साठी वधस्धतंभाच्या वेदिवर स्वप्राण अर्पण केला. (मत्तय २:१) यरुशलेम या नावाचे विष्लेशण पाहू या. ‘यरु’ म्हणजे स्थापित करणें, प्रस्थापना करणें. ‘शलेम’ ह्या शब्दाचा उगम शालोम या शब्दापासून आहे. शालोम म्हणजे शांती. या प्रकारे यरु + शलेम म्हणजे ‘शांती प्रस्थापित करणे’ किंवा ‘शांतीचे नगर’. येशू ख्रिस्त शांती प्रस्थापित करण्यास आला. मानवाच्या पापाने ढवळलेल्या जीवनास स्थैर्य देण्यास आला.

येशू ख्रिस्त मानवाच्या पापक्षमेसाठी देवाकडे मध्यस्थी करण्यास आला. पापक्षमा ही अर्पणावर विश्वास ठेऊन अर्पणाद्वारे मागितली जात असे आणि अर्पणाचें कार्य मानवासाठी मध्यस्थ म्हणून याजक करत असे. पवित्र बायबल मध्ये याजकाचा प्रथम उल्लेख, उत्पत्ती या पुस्तकात आढळतो. उत्पत्ती अध्याय १४ वचन १८ मध्ये… शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामास सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता. या वचनातून हे स्पष्ट होते कीं, मलकीसदेक राजा व याजक होता.

यरुशलेम हे राजांचे व परात्पर देवाच्या याजकांचे शहर होते. येशू ख्रिस्त हा राजांचा राजा असल्यामुळे यरुशलेमेशी त्याचा अटूट संबंध असणे आवश्यकच होते. येशू ख्रिस्त हा खरा याजक आहे. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टीसंबंधी प्रमुख याजक होऊन आला (इब्री ९:११) त्याविषयी लिहीले आहे की, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस” (इब्री ५:६; स्तोत्र ११०:४). हा मलकीसदेक, शालेमाचा राजा होता व परात्पर देवाचा याजक होता (इब्री ७:१). दाविदाच्या मृत्युनंतर दक्षिणेकडील यहूदा वंशजांची यरुशलेम ही राजधानी होती. अब्राहाम आपला पुत्र इसहास याचे अर्पण करण्यास ज्या मोरिया डोंगरावर गेला होता तो डोंगरही यरुशलेमेतच होता. मानवाच्या पापक्षमेसाठी ज्या येशूचे अर्पण होणार होते तो सुद्धा यरुशलेमेतून येणे हे अर्थपूर्ण होते. शलमोन राजाला देवाने वचन दिले होते कीं, “हे जे मंदिर तूं बांधिले आहे त्यास माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील (१ राजे ९:३). या कारणांमुळे या ठिकाणाहूनच शांती प्रस्थापित होणे व ती ख्रिस्ताद्वारे प्रस्थापित होणे संयुक्तिक, अर्थपूर्ण व दैवीयोजने प्रमाणे होते. या प्रमाणे येशू ख्रिस्त यरुशलेमातून येणे ही गोष्ट तो परात्पराचा याजक व राजांचा राजा असल्याचे दर्शविते.

बेथलहेम या गावीच येशूचा जन्म का व्हावा या प्रश्नाचे सुलभ व स्पष्टीकरणात्मक उत्तर पवित्र बायबल मधील मीखा संदेष्ट्याचें पुस्तक अध्याय ५ वचने २ ते ७ मध्ये मिळते. पवित्र देवाने त्याची योजना व संकल्प त्याच्या संदेष्ट्यांच्या द्वारे येशूच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षे आधीच घोषीत केली होती. ह्यात हेतू हा कीं, मनुष्यांना येशुच्या जन्माचे आकलन व्हावे आणि संकेत स्थळांना त्यांच्या नावांवरुन पुष्टी मिळावी.

येशूचा जन्म यहुदावंशात दाविदाच्या कुळात होणार होता. म्हणून दाविदाचे जे गांव होते त्या गावात येशूचा जन्म होणे आवश्यक होते. दाविद हा बेथलहेमचा होता हे आपणांस १ शमुवेल १६:१ व १७:१२ या वचनांमधून स्पष्ट होते. देवदुतांनी सुद्धा ज्यावेळी मेंढपाळांना येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता सांगितली (लूक २:११) त्यावेळी, “दाविदाच्या गावांत तारणारा जन्माला आहे” असे सांगितले. कैसर औगुस्त याने सर्व जगाची नांवनिशी लिहिण्याची आज्ञा केल्यावर योसेफ हा दाविदाच्या घराण्यांतला व कुळांतला असल्यामुळे दाविदाच्या बेथलहेम गांवी गेला (लूक २:४) व त्या गावी येशूचा जन्म झाला.

बेथलहेम या नावाचा अर्थ ‘भाकरीचे घर’ असा होतो. भाकर मनुष्याच्या पोषणासाठी, वाढीसाठी किंबहुना जीवनासाठी आवश्यक आहे. येशू स्वतःविषयी बोलताना म्हणतो की, “मी जीवनी भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही” (योहान ६:३५). “तुमच्या पुर्वजांनी आकाशातून पडलेला मान्ना खाल्ला परंतु मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” (योहान ६:५०) आमच्या आध्यात्मिक, आत्मिक वाढीसाठी, पोषणासाठी येशू ही जीवनी भाकर आंम्हाला देवाने दिली आहे. येशू म्हणतो. “माझा देह खरे खाद्य आहे व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो मजमध्ये राहतो व मी त्याजमध्ये राहतो” (योहान ६:५५, ५६). “जो ही भाकर खातो तो सर्वकाळ वांचेल” (५८). ह्या प्रकारे भाकरीच्या घरातून (बेथलहेम) आलेला येशू हीच खरी जीवनी व सर्वकाळासाठी वाचविणारी भाकर आहे. हे सांकेतिक दृष्ट्यासुद्धा पटवून देण्यासाठी येशूचा जन्म बेथलहेम गांवी झाला. मीखा संदेष्ट्याच्या पुस्तकात ५:२ मध्ये आम्ही वाचतो की, “हे बेथलहेम एफ्राथा…. तुझ्यामधून एक जण निघेल, तो मझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.” तसेच मत्तय २:६ मध्ये लिहिले आहे की, “हे यहूदाच्या प्रांता, बेथलहेमा, तूं यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळींच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.”

या आधी आपण पाहिलेच आहे की, येशू परात्पराचा याजक आहे. याजकाचा आणि भाकरीचा जवळचा संबंध आहे. मोशेने अहरोनाच्या मुलांचे समर्पण करताना परमेश्वरासमोर ठेविलेल्या बेखमीर भाकरींच्या टोपलीतून एक बेखमीर पोळी, तेल लाविलेली एक भाकर…. उजव्या मांडीवर ठेविल्या (लेवीय ८:२६). या आध्यात्मिक भाकरीचा आम्ही शरीराकरिता किंवा भौतिकतेकरिता उपयोग करु नये. येशू ख्रिस्ताने पांच हजार लोकांना अरण्यात भाकरी खावयास दिल्या. नंतर येशू कफर्णहूमास निघून गेला. दुसऱ्या दिवशी तोच जनसमुदाय (योहान ६:२२ ते २७) त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणी आले. तेथे येशू नव्हता तेंव्हा ते त्याचा शोध घेत कफर्णहूमास गेले. येशूने त्यांना म्हटले, “मी खचित सांगतो तुम्ही चिन्हें पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करिता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जो देव त्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा”. येशूच्या शिकवणिचा हेतू हा होता की, तो देवाने बेथलहेमातून पाठविलेली जीवनी भाकरी आहे हे लोकांनी ओळखावे. परंतु मनुष्य भौतिक इच्छातृप्तीलाच जास्त महत्व देतो. नेमकी हीच गोष्ट सैतानाला माहित असल्यामुळें मनुष्यदेहांत असणाऱ्या ख्रिस्ताला त्याने धोंड्याच्या भाकरी करण्याचा मोह घालण्याचा प्रयत्न केला. येशूने त्याला सांगितले, ”मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” हेच वचन ख्रिस्तजन्मोत्सवाच्या दिवशी आंम्ही स्मरणे आहे. यशया २:३ मध्ये लिहीले आहे, “यरुशलेमेंतून परमेश्वराचे वचन निघेल.” येशू स्वतःच जीवनी भाकर होता व देवाकडून नियुक्त केलेला ‘धोंडा’ होता जो बांधणाऱ्यांनी नाकारला परंतु कोनशिला झाला.

येशू ख्रिस्ताचे बालपण नासरेथ या गावी गेले. नासरेथ या गावी तो बालक म्हणून जसा अंकूर वाढत जावा तसा वाढत गेला. यशया अध्याय ५३:२ मध्ये म्हटले आहे की, तो रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. मुळात नासरेथ ह्या शब्दाचा अर्थच आहे की अंकूर फुटणे, कोंब येणे, नवजीवनाची पालवी येणे.

सैतानाने आदाम आणि हवा यांचे कडून देवाची आज्ञा भंग करुन मानवाचा देवाशी असलेला संबंध तोडला होता. एखाद्या फांदीला कापून झाडापासून वेगळे करावे तसे मानवाला देवापासून वेगळे केले होते. हे तोडलेले संबंध परत जोडले जाणे आवश्यक होते. छाटलेल्या फांदी मध्ये परत जीव येवून तिला नवजीवनाची पालवी/धुमारा फुटणे ही मानवी जीवनाची गरज होती. “नासरेथ’ ही गरज पूर्ण करण्यासाठी देवाचा अंकूर वाढत होता. यशया ११:१-२ मध्ये लिहिले आहे, “इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल; परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर राहील.” ही पालवी, धुमारा ख्रिस्तजन्माच्या रूपाने जगात आला. म्हणुन आम्ही ख्रिस्तजन्मोत्सव साजरा करतो. येशू ख्रिस्ताला ‘नासोरी’ येशू म्हणून संबोधले आहे. ‘नासोरी’ म्हणजे जो नासरेथचा आहे तो. सैतानाने छाटलेली मानव आणि देव सहभागीतेची फांदी या प्रकारे ख्रिस्ताच्या जन्मामुळे पुनः बहरली. तिला धुमारा फूटला.

येशूने आपला कार्यारंभ करण्यापूर्वी अर्थपूर्ण असा बाप्तिस्मा घेतला. त्याचा बाप्तिस्मा ‘यार्देन’ नदीत झाला (मार्क १:९) यार्देन या शब्दाचा अर्थ होतो उंचावरुन खाली कोसळणे, अर्थात मृत्यु स्विकारणे. येशू ख्रिस्त ऊंचावरुन म्हणजे स्वर्गातून खाली म्हणजे पृथ्वीवर आला. पृथ्वीवर त्याने मानवाच्या तारणासाठी मृत्यु स्विकारला. यार्देन नदी सुद्धा ऊंचावरुन वाहत येते व ती जावून मृत समुद्राला मिळते (तिचा शेवट मृत समुद्रामध्ये होतो.) येशू जरी ऊंचावरुन (स्वर्गातून) आला असला तरी त्याला मृत्यु स्विकारावा लागणार आहे हेच संकेत ‘यार्देन’ ने दिले.

मार्क १:१४ आणि लूक ४:१४ या वचनांनुसार येशूने त्याच्या कार्याचा आरंभ गालील प्रांतातून केला. गालील प्रांतातून तो इतर प्रांतामध्ये म्हणजे इतुरिया, फिलीपाचे कैसरीया, शमरोन, दकापलीस व यहुदा या प्रांतामध्ये गेल्याचा उल्लेख आहे. परंतु कार्याची सुरवात मात्र गालीलांतून आहे. त्याचा हा प्रवास म्हणजे त्याचें कार्य कसे कसे होत गेले हे उलगडून दाखविणारा पट आहे. असा पट की जो त्याच्यासाठी देवाने आधीच गुंढाळून ठेवलेला गालीचा होता. विशेष म्हणजे गालील या शब्दाचा अर्थ गुंढाळी किंवा गुंढाळून ठेवलेला गालीचा असा होतो. येशू जसा जसा देवाच्या योजनेप्रमाणे, संकल्पाप्रमाणे चालत गेला तसा तसा हा गालीचा पायघड्या प्रमाणे त्याच्या पुढे उलगडत गेला. येशू ख्रिस्ताने गालीलातून कार्यारंभ करणे हे तो देवाने आखलेल्या मार्गानेच चालत जाईल याचा सुसंकल्प होता. गालीच्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो सरळ असतो. वेडावाकडा नसतो. येशू वेडावाकडा म्हणजे मार्ग सोडून जाणार नाही हेच गालील ह्या नावाने सूस्पष्ट केले होते.

आम्हां प्रत्येकाच्या जीवनाचा संकल्प व मार्ग देवाने गूढ अर्थाने नियोजित केलेला आहे (यिर्मया २९:११). तो आंम्ही समजून घ्यावा व स्विकारावा. तसे केल्यास देवाच्या योजनांना अडखळण येणार नाही. आम्ही आमच्याच मार्गाने चालू नये. याबाबतीत ख्रिस्त जन्मोत्सवाशीच निगडीत असलेली घटना म्हणजे मागी लोक येशूचे दर्शन घेण्यासाठी स्वतःच्याच बुद्धिवर अवलंबून राहून स्वत:च्याच मार्गाने चालले. परिणामी त्यांना येशूचे दर्शन होण्यास विलंब झाला व येशूच्या दर्शनाची त्यांच्या जीवनात देवाने केलेली योजना पूर्ण होण्यास काळ लागला. परंतु येशूच्या दर्शनानंतर परतीच्या प्रवासात ज्यावेळी देवदुताने त्यांना स्वप्नात दर्शन देवून हेरोद राजाकडे न जाता दूसऱ्या मार्गाने जाण्यास सांगितले तेंव्हा त्यांनी त्याचे ऐकले. त्यांनी देवाने दाखविलेला मार्ग स्विकारला. त्यामुळे हेरोद राजा येशू बाळाला मारु शकला नाही व देवाच्या योजनेत अडखळण आले नाही. ज्या वेळी आम्ही ईश्वर नियोजित मार्गांनी चालतो त्यावेळी सैतानाचा पराभव होतो आणि देवाच्या योजना पूर्णत्वास नेण्यास आंम्ही साधन ठरतो. आंम्ही आमच्याच मार्गाने पुष्कळ प्रवास केला आहे त्यामुळे कदाचित येशूचे दर्शन होण्यास आम्हांस विलंब होत असेल तर आता आमचे मार्ग बदलूयात. पुन: त्याच मार्गाने जाणार नाही हा सुनिश्चय करू म्हणजे माझ्या जीवनासाठी असलेले गूढ संकल्प सिद्धिस जातील व ख्रिस्तजन्मोत्सव माझ्यासाठी अधिक हर्षउल्लासाचा होईल.