नवीन वर्षांत पाऊल टाकतांना…!

नवीन वर्षांत पाऊल टाकतांना आम्हाला आमच्या अंतःकरणास प्रसन्न करणाऱ्या, संतोषविणाऱ्या नवीन साधने, अनुभव, अपेक्षा यांची पुर्तता व्हावी अशी मनोमन तळमळ असते. नवीन या शब्दाचे नाविन्याशी अतूट नाते आहे. नाविन्य म्हणजे या आधी कधीही न अनुभवलेली गोष्ट. नाविन्यपूर्ण गोष्टीचा अनुभव घेताना ती जर परमेश्वराकडून आणि परमेश्वरासाठी असेल तर तिच्याद्वारे आशिर्वादांची खात्री निश्चित असते.
“नवीन”, या आधी कधीही न अनुभवलेल्या जगांत प्रथम पाऊल टाकून प्रवेश करण्याचा अनुभव घेतलेल्या व्यक्ती विषयी चिंतन करणे हे या वेळी संयुक्तिक ठरेल. पवित्र शास्त्रातील ती व्यक्ति म्हणजे नोहा. नोहा व त्याचे कुटुंब तारवात होते. तारवा बाहेरील जगात एकही श्वासवान जीव जीवंत नव्हता. जगामध्ये संपूर्णत: मृत्युचेच अस्तित्व होते. ज्यांच्या म्हणून नाकपुड्यात प्राण होता ते कोरड्या जमिनीवरले झाडून सारे मेले. (उत्पत्ति ७:२१ ते २३) फक्त आणि फक्त तारवाच्या आंत जीवन होते. तारवांत असताना देवाची पुढे काय योजना आहे व नवीन आव्हाने माझी वाट पाहत आहेत हा प्रश्न व जाणीव नोहाला निश्चितच सतावित असावी.
देवाच्या सांगण्यानुसार नोहा तारवातून बाहेर आला. त्यावेळी तो त्याची पत्नी, मुले व सुना या शिवाय भुतलावर कोणीही मनुष्य जीवंत नव्हता व त्याच्या बरोबर तारवांत असलेल्या पशु-पक्ष्यांशिवाय इतर जीव जीवंत नव्हते. ही गोष्ट नोहाने कधीही अनुभवली नव्हती. हे सर्व नोहासाठी नावीन्यपूर्ण होते. जे कधीही नोहाला भूतकाळात पाहण्यात आले नाही अशा नवीन गोष्टीला नोहा सामोरा जात होता. प्रिय बंधु-भगिनिंनो आपण सर्व भुतकाळात कधीही न पाहिलेल्या नवीन वर्षाला सामोरे जात आहोत. नोहाच्या जीवनाला नव्याने सुरवात होणार होती. जुने ते होऊन गेले. पाहा ते नवीन झाले. (२ करिंथ. ५:१७) या प्रमाणे ते झाले होते. देवाने त्याच्या जीवनात योजिलेली गोष्ट त्याच्या स्वागतास तयार होती. तो प्रसंग, ते चित्र आपल्या डोळ्यापुढे आणा. नोहाने नावीन्यपूर्ण भूतलावर प्रथम पाऊल टाकले. पापी जण आणि मरण यांची सत्ता दूर झालेली अशी ती नावीन्यपूर्ण पृथ्वी होती. तीनशे पंचाहत्तर दिवस व रात्र नोहा तारवात होता. या दिवसांत संकटे, क्लेष व मरण त्याच्या जवळच (म्हणजे तारवाच्या बाहेर) होते. परंतु देवाने नोहाला त्या पासून दूर ठेवून सुरक्षित ठेवले होते. पृथ्वीवर प्रथम पाऊल टाकतांना नोहाच्या अंत:करणात ही आशिर्वादाची व कृपेची जाणीव खोलवर रुजली असणार म्हणूनच त्याने नवीन आयुष्याला सुरवात करताना सर्व प्रथम जे केले ते म्हणजे त्याने परमेश्वरा प्रित्यर्थ वेदी बांधिली आणि त्याच्या बरोबर तारवात होते अशा शुद्ध पशु व पक्षी यांतले कांही घेऊन त्या वेदीवर त्यांचे हवन केले. नोहाचे पहिले पाऊल जे पुढे पडले ते परमेश्वराच्या उपकाराच्या जाणिवेने त्याचे उपकारस्मरण करण्यासाठी. त्याने स्वतःसाठी घर बांधण्याचा विचार न करता प्रथम देवासाठी वेदी बांधली. त्याने त्याच्या गरजांचा विचार केला नाहीं. कारण आज पर्यंत जो देव त्याच्या बरोबर होता, तोच देव नवीन वर्षाची सुरवात करताना व त्या पुढेही त्याच्या बरोबर असणार, हा त्याचा विश्वास होता. देवाने अब्राहामाला, इसहाकाला, याकोबाला, मोशेला आणि यहोशवाला हेच अभिवचन दिले की, मी सदोदीत तुझ्या बरोबर असेन. हेच अभिवचन ख्रिस्ताने आम्हाला दिले आहे की, “पाहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.” (मत्तय २८-२० )
नव्या वर्षांत प्रवेश करताना मी कोणत्या विश्वासाने माझे प्रथम पाऊल पुढे टाकणार आहे? नवीन वर्षात पदार्पण करणाऱ्या माझ्या प्रथम पावलागणिक मी देवाच्या उपकार स्मरणाने सुरवात करावी. माझ्या नवीन वर्षांतील नवीन जीवनाची सुरवात मी देवाच्या उपकार स्मरणाने करावी. नोहाने शुद्ध पशु, पक्ष्यांचे हवन केले. त्याचा सुगंध घेऊन देवाला संतोष झाला व देव म्हणाला, “मानवामुळें मी इत: पर भुमीला कधीही शाप देणार नाही.” (उत्पत्ति ८:२१) मी नवीन वर्षात पाऊल टाकताना अशी उपकारस्तुती व प्रार्थना करावी की, जेणेकरुन माझी प्रार्थना देवाला संतोषवील व सुगंधी द्रव्य अशी समर्पित होईल. ज्यामुळे केवळ माझ्यावरच नव्हे तर माझ्या मुळे इतरांवरही शाप येणार नाहीत. नवीन वर्षात पडणाऱ्या माझ्या पावलाचा ठसा काय दर्शविणार आहे ? माझ्या पावलांची दिशा कोणती असेल ?
नोहाने केलेले अर्पण, ते सुगंधी द्रव्य साक्ष देत होते की, आकाशातून होणारी जलवृष्टी थांबली आहे व कृपेचीवृष्टी सुरु झाली आहे. ज्या व्यक्तीकडून मला आशिर्वादांची अपेक्षा आहे त्या व्यक्तिला संतोषविल्याशिवाय ते प्राप्त होणार नाहीत, हे कालाबाधित सत्य आहे. देवाला संतोषविणारे, सुगंधी हव्य अर्पण करणे म्हणजे देवाच्या आज्ञा पाळून त्याच्या इच्छेप्रमाणे चालणे.
नव्या वर्षांत पाऊल टाकत असतांना माझ्या जीवनाची व अर्पणाची शुद्धतेविषयी असलेली कल्पना व व्याख्या माझ्या अपेक्षे प्रमाणे नसावी तर देवाने जे शुद्ध ठरविले आहे ते मी त्याला अर्पण करावे. शुद्धता ठरविणारा देव आहे. नोहाने केलेल्या सुगंधी हवनाने देवाला संतोष झाल्यानंतर देव नोहाशी बोलला नाही तर तो मनात म्हणाला… (उत्पत्ति ८:२१) माझ्या जीवनाचा मी असा यज्ञ करावा की, जो देवाच्या मनाचा ठाव घेईल. नोहा सुद्धा नवीन जीवनाची सुरवात करताना बोलला नाहीं त्याने कृति केली. माझ्या कृतितून मी देवाला संतोष द्यावा. त्याचा परीणाम पुढे येणाऱ्या सर्व नवीन गोष्टींसाठी कायमचा आशिर्वाद मिळण्यात होईल. माझे केवळ पहिले पाऊलच नव्हे तर संपूर्ण जीवन देवाबरोबर चालण्यात जावे, जसे की हनोखाने केले. हनोखाला लोकांतरी नेण्यात आले. लोकांतर होण्यापुर्वी त्याविषयी साक्ष झाली की, “तो देवाला संतोषवीत असे; आणि विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे.” (इब्री ११:५-६ ) मी देवाला जर सुगंधी हव्य म्हणून अर्पण करु इच्छितो तर त्या अर्पणासोबत विश्वास हवा, कारण विश्वासावाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. माझी, प्रार्थना, माझे हात उभारणे फार प्रभावी व मधाप्रमाणे गोड शब्दांचे असेल परंतु त्यासोबत विश्वास आहे का? हनोख देवाच्या समागमे रहात असे (उत्पत्ति ५:२४) म्हणजे तो देवाच्या आज्ञापालनामुळे देवाला संतोषवीत असे. त्याने स्वत:चे जीवन देवाला सुगंधी हव्य असे अर्पण केले होते.
येशूख्रिस्त सुद्धा जसे देवाला अपेक्षित तसेच जीवन जगला. ख्रिस्ताने तुम्हावर प्रीति केली, आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरितां अर्पण व यज्ञ असे दिले. (इफिस ५:२)
माझे पाऊल सावधानतेने पुढे टाकणे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनाचे अर्पण करणे, हे देवाला अपेक्षित आहे. माझी उक्ती आणि कृति भिन्न व फसव्या असतील आणि माझ्या दृष्टिने सुगंधीतही असतील तरी देव त्याचा स्विकार करणार नाही. लेवीय अध्याय २६:२७,३१ मध्ये लिहीले आहे की, “जर तुम्ही माझे ऐकले नाहीं व माझ्या विरुद्ध वागलात तर तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास मी घेणार नाही.”
फिलिप्पैकरांनी जेंव्हा संत पौलाला अर्पणे दिली ती त्याला जसा काय सुगंध, जसा काय देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ अशी झाली. (फिलिप्पै ४:१८), कारण जसे अपेक्षित होते तसे त्याला मिळाले. आंम्ही सुद्धा सर्व प्रकारें प्रभुला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे. (कलस्सै १:१०)
नोहाने हवन करण्यापुर्वी देवाने पापप्रवृत्तिने माखलेल्या सर्वांचा नाश केला व पृथ्वी पाण्याने धुतली गेली. मलीन वस्त्रांचा संकेत पवित्रशास्त्रात पापाशी आहे. आम्ही आमची वस्त्रें धुतल्या शिवाय नवीन वर्षांत, नवीन नगरीत प्रवेश कसा करणार? जे आपली ‘वस्त्रे धुतात’ ते वेशीतून नगरात जातील (प्रकटी. २२:१४) आंम्ही वेशीतच कोठपर्यंत बसून राहणार? नगरीत प्रथम पाऊल टाकण्याची तयारी करा. कारण परमेश्वराप्रित्यर्थ मधुर सुगंधी हव्य अर्पण करणे ही देवाची आज्ञा आहे. (निर्गम २९:१८)
देवाच्या या वचनांवर आपण चिंतन करू आणि नववर्षांत पदार्पण करण्यासाठी नोहा प्रमाणे देवाने आम्हावर केलेल्या उपकारांच्या जाणीवेनें प्रथम पाऊल टाकू.