ती दुपार!
आम्ही निसर्गरम्य नसरापूर आध्यात्मिक केंद्रात उन्नती साधत होतो. बाहेर सुर्य आग ओकत होता, आणि आतमध्ये पवित्र आत्मा त्याच्या अग्निने उपस्थितांस पेटवत होता. वचन असे अंत:करणाला छेदून जात होते की खातरी करून देण्याचे क्षेत्रच शिल्लक राहात नव्हते. देव माझ्याशी बोलत होता, त्याचे वचन माझ्या अंत:करणाशी झोंबी करत होते. माझ्या जीवनाचा दैवी उद्देश काय आहे? मी सध्या काय करत आहे? मी काय करावयास हवे? हे सगळे देव जणूकाही शेजारी बसून अगदी स्पष्ट शब्दांमध्ये बोलत होता. लंगड्या सबबी द्यायला जागाच उरत नव्हती. तीन-चार दिवस पवित्र आत्म्याने प्रेरीत संदेश व शास्त्राभ्यास आणि इतर कार्यक्रमांनी आम्ही ओले चिंब झालो होतो. कँपचा शेवटचा दिवस, संदेशाचा शेवट, वक्ते बोलले की तुम्ही किती दिवस आपल्या मंडळ्यांमध्ये मर्यादीत राहून कार्यरत राहाणार? जगाला आपल्याद्वारे सुवार्ता ऐकण्याची गरज आहे. ज्याला देव सांगतो त्याने उभे राहावे व देवाशी त्याच्या सेवेकरिता वचनबद्ध व्हावे. हे बोलणे चालू असतांनाच मी आपोआप असा उभा राहिलो की जणूकाही देवानेच मला हात धरून उभे केले असावे. मी देवाला वचन दिले की मी आजपासून माझे संपूर्ण जीवन तुझ्या सेवेस अर्पण करतो. माझ्यासोबत अजूनही लोक उभे राहिले होते. त्यांनी नंतर काय केले हे मला माहीत नाही पण मी मात्र प्रभूला दिलेल्या वचनावर ठाम उभा राहिलो आणि देव माझ्यासाठी सेवेची अशी दालने उघडत गेला की मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. देवाने माझी अधिक तयारी करून घेतली आणि माझ्या ठायी असणारा अभ्यासक जागृत करून पवित्र शास्त्राचा अधिक सखोल अभ्यास माझ्याकडून करून घेतला आणि वेळी-अवेळी अनेक ठिकाणी उभे करून माझ्याकडून वचनाची सेवा करून घेतली. मला सीएनआय चर्चने पुढे सनद देऊन दिक्षा सुद्धा केली व मंडळीची जबाबदारी दिली. मात्र देवाने पुन्हा मला माझ्या समर्पित मार्गावर म्हणजे मंडळीच्या बाहेर असणार्या लोकांनाकडे, ज्यांना सुवार्तेची गरज आहे त्यांच्याकडे वळवले. मी देवाची स्तुती करतो की त्याने अनेकांच्या जीवनाला कलाटणी देणारी सुवार्ता सेवा माझ्याकडून करून घेतली आणि आजही करून घेत आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये देवाने मला अनेक सहकारी व प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक दिले जे आजही मला अधिक धारधार बनविण्याचे काम अविरत करत असतात. त्यांच्याकरिता मी देवाला शतश: धन्यवाद देतो.
ती दुपार, तो पवित्र आत्म्याचा अग्नि, ते त्याचे पावलोपावली चालवणे हे अविस्मरणीय आहे!