ख्रिस्ती पुढारीपण म्हणजे चारित्र्य!

ख्रिस्ती पुढारपण ही एक कौशल्यपूर्ण आणि जोखमेची बाब आहे. सद्यस्थितीमध्ये ख्रिस्ती समाजा मधून किंवा मंडळ्यांमधून खऱ्या ख्रिस्ती पुढाऱ्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. याची कारणे तशी बरीच असली तरी प्रामुख्याने सर्वांनाच पुढारपण करण्यास आवडते हे प्रमुख कारण आहे. आम्हाला शिष्य किंवा कार्यकर्ता होण्यापेक्षा नेतृत्व करणारा पुढारी होणे हा पर्याय आवडतो. आमच्या सूचना व मागण्यानुसार आमच्यासाठी बऱ्याच कार्यकर्त्यांनी कामे करावीत ही पुष्कळाची मनोमन इच्छा असते. दुसरे कारण हे आहे की विश्वासहार्य नेतृत्वाचा अभाव. स्वहित व स्वकेंद्रीत पुढारपण आजकाल फोफावत चालले आहे. पुढारपण हे आर्थिक पाठबळ, मनगटशाही किंवा घराणेशाही यांच्या जोरावर करावयाची बाब नाही. सामाजिक प्रश्नांची किंवा समस्यांची जाण, त्या सोडविण्याचे कौशल्य, त्याग, निष्ठा, समर्पित वृत्ती या पुढारपणासाठी प्राथमिक आवश्यक बाबी आहेत.
खऱ्या पुढार्याचा सत्वगुण हा आहे की तो कार्यकर्ते घडवीत नाही तर नवीन पुढारी घडवतो. माझ्या ऐवजी कोण यापेक्षा माझ्या नंतर कोण या समस्येने तो ग्रासलेला असतो. दुर्दैवाने माझ्या ऐवजी इतर कोणीही नेतृत्व करू नये या विचारानेच आजचे पुढारी सीमित झाले आहेत. पुढाऱ्याचे पुढील पाऊल किंवा निर्णय काय असेल याबद्दल केवळ कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्व समाजाला ग्वाही किंवा खात्री देता येत नाही त्याच्याबद्दल निश्चित भाकीत करता येत नाही, आमचा पुढारी काय करील याची खात्री, शाश्वती, निश्चिती, किंवा भाकीत करता येत नाही.
वरील बाबी विचारात घेता पुढारपणाबद्दल पुढील निष्कर्ष निघतात. पहिला निष्कर्ष म्हणजे खरा पुढारी हा कार्यकर्ते नव्हे तर नवीन सक्षम पुढारी तयार करतो. दुसरा निष्कर्ष म्हणजे ख़ऱ्या पुढार्याबाबत भाकिते करता येतात. जे आपल्या सत्वगुणानुसार बदलत नाहीत त्यांच्याबद्दल भाकीत करणे सुलभ असते. न बदलणे किंवा भाकीत करता येणे हे त्या व्यक्तीचे कॅरेक्टर असते “कॅरेक्टर” या इंग्रजी शब्दासाठी मराठीत “चारित्र्य” हा शब्द प्रचलित आहे.
चारित्र्याचा अभाव ही फार मोठी खंत आजच्या पुढार्याबद्दल व्यक्त केली जाते. प्रश्न हा आहे की चारित्र्य म्हणजे नेमके काय? चारित्र्य म्हणजे व्यक्तीच्या ठायी असलेले अंगभूत सत्वगुण. चारित्र्य असलेल्या व्यक्तीबद्दल खात्रीशीर निष्कर्ष किंवा मत व्यक्त करता येऊ शकते. त्याच्याबद्दल हमी देता येते; कारण तो आपल्या चारित्र्याशी ठाम राहतो. न बदलणाऱ्या चारित्र्याबद्दलची चार उदाहरणे देता येतील.
पहिले उदाहरण म्हणजे व्यक्तींचे पुतळे. राणी एलिझाबेथ चा पुतळा भारतात आणल्यास त्याला कोणीही झाशीच्या राणीचा पुतळा म्हणणार नाही. तसेच झाशीच्या राणीचा पुतळा इंग्लंडमध्ये नेल्यास त्याला कोणीही राणी एलिझाबेथचा पुतळा म्हणणार नाही. त्यांचे गुण कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत. त्यांची गुण वैशिष्ट्ये कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत
दुसरे उदाहरण म्हणजे अंक. १ (एक) हा अंक कोठेही गेल्यास एकच असतो. त्याची किंमत स्थान परत्वे किंवा काल परत्वे बदलत नाही. अमेरिकेत, जपानमध्ये, इंग्लंडमध्ये किंवा इतर कोठेही एक म्हणजे एकच. त्याची किंमत बदलत नाही.
तिसरे उदाहरण म्हणजे अक्षरे. तुम्ही भल्या पहाटे किंवा मध्यरात्री जरी A अक्षर शिकत असलात व ते कोणत्याही राष्ट्रात शिकत असलात तरी A म्हणजे A हाच अर्थबोध होतो.
चौथे उदाहरण म्हणजे रासायनिक सूत्रे. H2O म्हणजे H2O व त्याचा अर्थ पाणी म्हणजे पाणीच. KMnO4 म्हणजे KMnO4 व त्याचा अर्थ पोटॅशियम परमॅग्नेट. ही सूत्र कितीही बदलण्याचा प्रयत्न केल्यास बदलत नाहीत.
परंतु मानवी चारित्र्य मात्र बदलते.
थोडक्यात पुढाऱ्याने पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाओ लगे उस जैसा असे वागू नये अशी लोकांची अपेक्षा असते. ख्रिस्ती पुढाऱ्याच्या बाबतीतही त्याचे चारित्र्य गुण काय आहेत याबाबतीत स्वतः येशू ख्रिस्ताने मतय अध्याय ५ वचन १४ मध्ये म्हटले आहे की, “तुम्ही जगाचा प्रकाश आहा;…दिवा लावून कोणी मापाखाली ठेवीत नाहीत, दिवठणीवर ठेवतात.” या ठिकाणी ख्रिस्ती व्यक्ती जगाला मार्गदर्शक प्रकाश असा आहे. प्रकाश देण्याकरिता त्याची जागा दिवठणीवर नेमस्त आहे. तो मापा खाली झाकला जाऊ नये. माप हे व्यवहाराचे चिन्ह आहे. आम्ही मापाने वस्तूचे वजन, आकारमान, लांबी, रुंदी ठरवितो. व्यवहार करताना आम्हाला चुकीचे माप देण्याचा मोह होतो व त्या प्रसंगी आमचा प्रकाश झाकला जातो. आम्ही आमच्या चारित्र्यानुसार वागत नाही. आम्ही दिवठणी वरून उतरून मापा खाली जातो. प्रकाश हे आमचे कॅरेक्टर (चारित्र्य) आहे. ते बदलता कामा नये. त्याचा अंधार होता कामा नये.
मार्क अध्याय ४ वचन २१ येथे येशू म्हणतो, “दिवा लावून तो पलंगाखाली ठेवत नाहीत.” पलंग हा एशोआरामाचे चिन्ह आहे. सध्याच्या युगात बरेच नेते विलासी जीवन उपभोगताना दिसतात. देवाने पुरविलेल्या सौख्यामध्ये, विलासी जीवनामध्ये आमचा प्रकाश झाकला जातो. आमचे चारित्र्य बदलले जाते. आम्ही प्रकाश देण्याचे विसरुन जातो. आम्ही झाकोळले जातो. .
लूक ८:१६ मध्ये येशू म्हणतो, “दिवा लावून भांड्याखाली ठेवत नाहीत.” भांडे हे संसाराचे चिन्ह आहे. पूर्वी विवाह प्रसंगी वधू-वरांना त्यांच्या संसारासाठी भांडी देण्याची प्रथा होती. या ठिकाणी ख्रिस्त ही बाब लक्षात आणू इच्छितो की तुम्ही तुमच्या संसारामध्ये इतकेच मश्गुल होवू नये की जेणेकरुन तुम्ही जगाचा प्रकाश आहात याची आठवण सुद्धा तुम्हास राहू नये. बरेच पुढारी प्रापंचिक गोष्टींना अवास्तव महत्त्व देतात किंबहुना पुढारी या पदाचा प्रापंचिक फायद्यासाठी लाभ घेतात. त्यांचे अपेक्षित चारित्र्य बदलते.
लूक ११:३३ या वचनात येशूने म्हटले आहे की, “दिवा लावून तळघरात ठेवत नाहीत.” तळघर हे नको असलेल्या किंवा टाकाऊ वस्तू संचित केलेल्या खोलिचे चिन्ह आहे. बऱ्याच गोष्टींची हाव आम्हाला सुटत नाही त्या गोष्टी आम्ही संचित करतो. हे जगीक गोष्टींमध्ये जीव गुंतला असण्याचे चिन्ह आहे. बरेचदा टाकाऊ गोष्टींना बाळगल्यामुळे किंवा बिलगल्यामुळे तुमचे पुढारपण टिकाऊ होण्याऐवजी टाकाऊ होते. यामध्ये आमच्या मनात घर करून बसलेले जुने विचार व इर्षा समाविष्ट असतात. आमचे चारित्र्य त्या तळघरांमध्ये बंदिस्त होते त्या तळघरातून आमचा प्रकाश लोकांप्रत पोहोचत नाही. समाजाचे पुढारपण करण्यास आमचे चारित्र्य फोल ठरते.
आम्ही प्रभावी आणि प्रवाही पुढारपण देऊ शकलो नाही तर कुचकामी ठरतो. मत्तय. ५:१३ मध्ये येशू म्हणतो, “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा; जर मिठाचा खारटपणाच गेला तर ते पायाखाली तुडविले जावे याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही.” थोडक्यात ज्या हेतूसाठी तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, त्या हेतूची पूर्तता जर तुम्हा कडून होत नसेल तर तुम्ही पायदळी तुडविण्याच्या योग्यतेचे आहा, येथे प्रश्न हा उभा ठाकतो की मिठाला खारटपणा कशाने येतो? व कशाने जातो? समुद्रातील खाडीचे पाणी वाफे तयार करून त्यामध्ये साठविले जाते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य मिसळले जात नाही किंवा इतर रासायनिक प्रक्रियाही केली जात नाही.
सूर्यप्रकाशाच्या किरणांनी आपोआप त्या पाण्यावर प्रक्रिया होऊन मीठ तयार होते. जेथे मिठाच्या संचित साठ्यावर सूर्यकिरणे पोहोचत नाहीत, तो साठा खारट होत नाही. ते मीठ असेल परंतु खारट नसेल. पुढारी ख्रिस्ती असेल परंतु त्याच्या जीवनावर जर ख्रिस्ताचा प्रभाव नसेल तर तो पायदळी तुडविण्याच्या योग्यतेचा आहे.
वरील मुद्द्यांचा सार हा आहे की आमच्या पुढारपणाच्या पाचारणाचा, पदाचा, निवडीचा, हेतू जर साध्य होत नसेल तर आम्ही अपात्र आहोत. ख्रिस्ती पुढारी म्हणून आवश्यक असलेल्या वरील बाबी ख्रिस्ताचा थोर सेवक संत पौल याच्या मतप्रणालीत व सेवा कार्यात ठळकपणे निदर्शनास येतात.
इफिसरास पत्र अध्याय ४ वचन १ मध्ये संत पौल लिहितो, “तुम्हास झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चालावे,” मतीत अर्थ हा आहे की, तुमचे जे चारित्र्य म्हणून तुम्ही दावा करता, ते तुम्हाद्वारे ठोस पणे सिद्ध व्हावे. तुम्ही लोकांसाठी तुमचे पद व तुमची पत ही तुमच्या पुढारपणातून अनुकरणीय करावीत. पौलाने स्वतः हे केले. पूर्ण आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने. तो १ करिंथ ४:१६, त्याच प्रमाणे १ करिंथ. ११:१६; फिलिपै. ३:१७ व फिलिपै. ४:९ मध्ये लिहितो की, “तुम्ही माझे अनुकारी व्हा.” एकदाच नव्हे तर चार वेळेस संत पौलाने हे म्हटले आहे. हे वाक्य आजचा ख्रिस्ती पुढारी म्हणू शकतो का?
तुमचे चारित्र्य हे सर्वांसाठी अनुकरणीय व कित्ता असे व्हावे. वर उल्लेखलेल्या मुद्द्यांप्रमाणे जसे प्रकाशाला अडखळण ठरणाऱ्या किंवा त्याच्या प्रभावाची पूर्तता होण्यास चार गोष्टी कारणीभूत आहेत, चार संकेत आहेत, त्याचप्रमाणे ख्रिस्ती पुढारपण उध्वस्त करणाऱ्या चार प्रमुख गोष्टी आहेत.
पहिली गोष्ट पुढार्यास देण्यात आलेला अधिकार. जर ख्रिस्ती पुढारी त्याच्या अधिकाराचा गैरवापर करत असेल, तर तो अधिकाराचा अवमान करणारा व चारित्र्य अभेद्य न ठेवणारा, बदलणारा, असा अयोग्य पुढारी आहे, ख्रिस्ती पुढाऱ्याने अधिकाराचा उपयोग सर्वांगीण विकासासाठी करावा. त्यामध्ये स्वहित असू नये.
दुसरी गोष्ट अधिकार व सत्ता यांची हाव. जर ख्रिस्ती पुढारी सत्तेशिवाय कार्य करू शकत नसेल तर तो अपयशी पुढारी आहे. खऱ्या पुढार्याला सत्तेची नशा नसते. बऱ्याच पुढार्यांना सत्तेची नशा असलेल्या धुंदीतच कार्य करता येते.
तिसरी गोष्ट पैसा. पैसा ही खऱ्या पुढार्याची मोठी कसोटी आहे. पैसा हाती आल्यास पुढारी भ्रष्ट होऊ शकतो. चारित्र्यहीन पुढारी पैशात गुंततो तर चारित्र्यशील पुढारी पैशाची गुंतवणूक करतो. पैसा हे प्रगतीसाठी अनेक पर्यायांपैकी एक असून तेच एकमेव साधन व पर्याय नाही हे चारित्र्यवान पुढारी त्याने साध्य केलेल्या यशातून दाखवतो.
चौथी गोष्ट देऊ केलेली मोकळीक. चारित्र्यवान पुढार्यास पाहिजे तसे वागण्याची मोकळीक दिली तरी त्याचे सत्वगुण म्हणजेच त्याचे चारित्र्य त्याची नीतिमत्ता बदलू देत नाहीत. तो दीपस्तंभा प्रमाणे अचल राहून दिशादर्शकाचे काम अविरहत करतच असतो. मोह, मायेच्या लाटा किंवा वादळे त्याच्या चारित्र्यात कोणत्याही प्रकारचा बदल घडवू शकत नाहीत. मी आहे तसाच असणार हा त्याचा सत्वगुण असतो. नीतिमूल्यांशी तो तडजोड करत नाही.
देव करो आणि ख्रिस्ती समाजाला अधिकार, सत्ता, पैसा व मोकळीक या गोष्टींच्या अडखळनामुळे भ्रष्ट न होणारे, आपल्या मूल्यांशी तडजोड न करणारे, आपला मार्ग सोडून आड मार्गाला न जाणारे, व ख्रिस्ताच्या प्रभावाने प्रभावित झालेले, आपल्या मूल्यांची व तत्वांशी तडजोड न करणारे, ज्यांच्याबद्दल खात्रीशीर ठाम भाकीत करता येईल असे पुढारी मिळोत.