ख्रिस्तानुवर्तन
येशू ख्रिस्ताला अनुसरणे म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे हा सोपा अर्थ आहे. ख्रिस्ताचा अनुयायी असणे ही गोष्ट अभिमानास्पद असल्यामुळे सुखावणारीही आहे. कारण त्यामुळे मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळणार आहे परंतु येशू ख्रिस्त जेंव्हा त्याच्या मार्गाने चालण्यास आम्हास आमंत्रित करतो त्यावेळी प्रत्यक्षात त्याच्या मागे जाणे हे किती कठीण आहे याची कल्पनाच नव्हे तर अनुभवही येतो.
हा अनुभव घेतलेल्या व्यक्तिंपैकी दोन व्यक्तिंचा अभ्यास आपण करु. ह्या दोन्ही व्यक्ती येशू ख्रिस्ताला त्याच्या प्रवासातील एकाच मार्गावर भेटल्या. पहिला फार श्रीमंत आहे तर दुसरा भिकारी आहे.
बायबलमधील मार्ककृत शुभवर्तमान १० व्या अध्यायांत या दोन व्यक्तींचा उल्लेख आढळतो. येशू ख्रिस्त यहूदीया प्रांतात यार्देनेच्या पलीकडून यरीहोस जाऊन यरुशलेमकडे प्रवास करीत होता. मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “उत्तम गुरुजी, सार्वकालीक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?” (मार्क १०:१७). हा मनुष्य सार्वकालीक जीवन मिळावे म्हणून त्वरा करीत आहे. (तो धावत येशूकडे आला) येशूने त्याला आज्ञापालनाबद्दल सांगितले असता (व-१९) तो तरुणपणापासून ह्या सर्व आज्ञा पाळीत असल्याचे सांगतो. किंबहूना या आज्ञापालनामुळे सार्वकालीक जीवनात प्रवेश सुलभ होईल अशी त्याची कल्पना असावी. परंतु येशूने त्याकडे केवळ प्रेमानेच नव्हे तर निरखून पाहून त्यातील उणीव त्यास दाखवून (व-२१) त्याची संपत्ति गोरगरिबांना देण्यास सांगितले. परंतु येशूचे हे शब्द ऐकून तो कष्टी होऊन निघून गेला. कारण तो फार श्रीमंत होता (व-२२).
१. या श्रीमंत मनुष्याने धावत येऊन प्रबल इच्छा असल्याचे दाखविले
२. येशूपुढे गुडघे टेकून नम्र असल्याचे दाखविले.
३. येशूला ‘उत्तम’ म्हणून येशूची स्तुती सुद्धा केली (व-१७) तसेच
४. आज्ञापालनात चोख असल्याचे सांगितले (व-२० )
येशूने त्याला स्वर्गातील संपत्ती व सार्वकालीक जीवनाच्या प्राप्तिसाठी जगिक संपत्ती गरीबांना देऊन “मागे येण्याचे” आमंत्रण दिले परंतु आमंत्रण नाकारुन तो निघून गेला.
वरील घटना झाल्यानंतर (साधारणत: आठ किलोमीटर चालून गेल्यावर) येशू शिष्यांसह यरीहोस आला (व४६) तेंव्हा मोठा लोकसमुदाय यरीहोहून बाहेर जात असता, तीमय याचा पुत्र बार्तीमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. नासरेथकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला, “अहो येशू दावीदपुत्र, मजवर दया करा.” त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले पण तो अधिकच ओरडू लागला तेंव्हा येशू तेथे थांबला व त्याला बोलाविण्यास सांगितले. लोक त्यास म्हणाले, “येशू तुला बोलावित आहे.” तेंव्हा तो त्याचा झगा टाकून येशूकडे आला. तुझ्यासाठी काय करावे असे, त्यास विचारले असतां त्याने दृष्टि प्राप्त व्हावी अशी याचना केली. येशूने त्यास म्हटले “जा, तुझ्या विश्वासानें तुला बरे केले आहे.” त्याला लागलीच दृष्टि आली व तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. १) श्रीमंत मनुष्याने येशूची ‘उत्तम गुरुजी’ म्हणून स्तुती केली. २) गुडघे टेकून सार्वकालीक जीवनप्राप्तीची विनंती केली. ३) आज्ञा तरुणपणापासून पाळीत असल्याचे सांगितले.
परंतु या तिनही गोष्टी त्याला सार्वकालीक जीवनप्राप्ती करुन देऊ शकल्या नाहीत. येशूने त्याच्याकडे १) निरखून पाहिले, २) त्याजवर प्रीति केली, आणि ३) त्याची उणीव दाखवून त्याची संपत्ती गोरगरीबांना देण्यास सांगितले. ४) आज्ञापालना बाबत विचारतांना येशूने पूर्ण दहा आज्ञांचा उल्लेख न करता फक्त सहा आज्ञांबद्दल विचारणा केली आहे.
पहिल्या चार आज्ञा देव आणि मनुष्य यांच्या संबंधाबाबत आहेत नंतरच्या सहा आज्ञा मनुष्याच्या इतर मनुष्यांशी असलेल्या संबंधाबद्दल आहेत. येशू श्रीमंत मनुष्याला ह्याची जाणीव करुन देत होता की, जर तू इतर मनुष्यांशी नीट संबंध ठेऊ शकत नसलास तर देवाशी संबंध कसे ठेवू शकणार? खून, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, ठकवणे याद्वारे तू पैसा कमावला नसशील. कधी कोणाकडे उसने मागण्यासाठी हात पसरला नसशील परंतु कोणाला उसने देण्यासाठी हात पुढे केलास का? कोणाचीही कधीही एक पै सुद्धा घेतली नसशील परंतु कधी कोणाला एक पै तरी दिलीस का?
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाच ते दहा या आज्ञांच्या पालनाविषयी विचारतांना येशूने आज्ञांचा क्रम बदलला आहे. पाचवी म्हणजे ‘आपला बाप व आई ह्यांचा मान राख’ ह्या आज्ञेचा उल्लेख येशू सर्वात शेवटी करतो कारण लूक १८:१८ नुसार हा श्रीमंत मनुष्य ‘अरखोन’ (ग्रीक बायबल मधील मूळ शब्द) म्हणजे परुष्यांचा अधिकारी होता. परुष्यांचे आज्ञापालनाचे स्वत:चे पोट नियम असत व त्यांच्या संप्रदायानुसार ते आज्ञापालन करीत. आई बापा संदर्भात मत्तय १५:६, त्यांच्या विषयी येशू म्हणतो, “परंतु तुम्ही म्हणता की, जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे कांही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करु नये. तुम्ही आपल्या संप्रदायेकरुन देवाचे वचन रद्द केले आहे.” (त्याचप्रमाणे मार्क ७:१० ते १२ जरुर वाचावे) ज्यावेळी श्रीमंत मनुष्यास येशूने त्याची संपत्ती गरीबांस वाटून मागे येण्यास सांगितले तेंव्हा श्रीमंत मनुष्याचे लक्ष येशूकडे न जाता त्याच्या पैशाकडे गेले व तो त्याच्या संपत्ती मागे गेला.
यरुशलेमेस वल्हांडण सणासाठी थव्याच्या थव्यांनी लोक जात असतां वाटेत रब्बी त्यांना धर्मशिक्षण देत असत. येशूच्या मागे सुद्धा फार मोठा लोकसमुदाय चालला होता. अशा परीस्थितीत हा श्रीमंत मनुष्य येशूकडे धावत (परंतु आस्थेने नव्हे) आला होता. त्याचे गुडघे टेकणे हे ढोंग होते. त्या श्रीमंत मनुष्याने १) ढोंग, २) स्तुति, ३) खोटे आज्ञापालन, व ४) भावनिकतेचे आव्हान या चार गोष्टिंद्वारे सार्वकालीक जीवन प्राप्तीची अपेक्षा केली. येशूने मागे येण्याचे आमंत्रण दिलेले असतांनांही पैशाच्यामागे निघून गेला.
आम्हांला १) ढोंग, २) स्तुति, ३) खोटे आज्ञापालन, ४) भावनिकतेची आव्हाने (मोठ मोठ्या प्रार्थना) याद्वारे सार्वकालीक जीवन प्राप्त होणार नाही.
या प्रसंगानंतर येशूची वाटेत बारतिमय ह्या आंधळ्या भिकाऱ्याशी भेट होते. आपणाबरोबर येणाऱ्या लोकांना धर्मशिक्षण देण्यासाठी येशू यरीहो शहरात उभा आहे. यरीहो हे शापित शहर आहे (यहोशवा ६:२६).
आंधळा भिकारी बारतिमय हे ऐकू शकत होता. येशू आहे असे ऐकल्यावर तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “अहो येशू, माझ्यावर दया करा.” परंतु लोकांनी त्याला गप्प केले. १) पहिला श्रीमंत मनुष्य भेटला त्याला कोणीही येशूकडे येण्यास मज्जाव केला नाही तो अधिकारी होता. भिकाऱ्याला मात्र गप्प केले. २) अधिकाऱ्याचे ऐकूण घेण्यासाठी लोकसमुदाय स्वतः शांत झाला. एकट्या श्रीमंताला बोलू दिले. या ठिकाणी एकट्या भिकाऱ्याला गप्प बसण्यास सांगीतले. ३) श्रीमंत मनुष्य स्वत:हून येशूकडे आला होता. भिकारी मनुष्यास येशूच्या बोलावण्यावरुन येशूकडे आणण्यात आले. ४) श्रीमंत मनुष्यास येशूने “माझ्यामागे ये” असे सांगितले परंतु श्रीमंत मनुष्य येशूच्या मागे गेला नाही, भिकारी मनुष्यास येशूने “जा” म्हणून सांगितले होते तरीही तो आपल्या घरी न जाता येशूच्या मागे गेला. ५) भिकारी मनुष्य येशूकडे आला तेंव्हा त्याने त्याचा झगा काढून टाकला. कारण तो चालतांना त्याच्या पायामध्ये अडखळत होता. येशूकडे येण्याचे अडखळण त्याने दूर केले. याच झग्याच्या खिश्यांमध्ये त्याने जमवलेले सारे पैसे होते. त्या खिश्यातील पैसे हीच त्याची संपत्ती होती. तरीही दृष्टि आल्यावर त्याने त्याचा झगा शोधला नाही किंवा माझ्या पैशांचे काय? असा विचार केला नाही तर येशूच्या मागे जाणे हीच शाश्वत संपत्ती आहे हे ओळखले.
श्रीमंत मनुष्यासही येशूने दृष्टि (उणीव दाखविली) दिली परंतु त्याने येशूला न पाहाता स्वत:ची संपत्ती पाहिली.
६) श्रीमंत मनुष्याला देवाने सर्वकाही (अधिकार, धर्मज्ञान प्रतिष्ठा, संपत्ती) दिले होते त्याच्या दृष्टिने त्याला कांही उणे नव्हते. तरीही येशूने त्याला त्याची उणीव दाखविली. परंतु त्याच्याकडे जे होते त्याचा त्याने देवाकडे येण्यासाठी उपयोग केला नाही. भिकारी मनुष्यास सर्व गोष्टींची उणीव होती. त्याच्याकडे होते ते म्हणजे तो फक्त बोलू शकत होता व ऐकू शकत होता. त्याने नेमक्या याच गोष्टींचा उपयोग ख्रिस्ताकडे येण्यासाठी केला. आम्हांला देवाने जे दिले आहे त्याचा उपयोग आम्ही ख्रिस्ताकडे येण्यासाठी करावा. ७) ऊंची विशिष्ट प्रकारचा झगा ही श्रीमंताची ओळख होती तर फाटका, जीर्ण झगा ही भिकाऱ्याची ओळख होती. ८) लोकसमुदायाच्या दबावाला (गप्प बस) भिकऱ्याने भीक घातली नाही. तो अधिक जोराने ओरडला. त्यासाठी मूळ बायबल मध्ये शब्द आहे ‘क्रॅझो’ म्हणजे जिवाच्या आकांताने हाक मारणे. मी येशूला कशा प्रकारे हाक मारत आहे?
श्रीमंत मनुष्य व भिकारी या दोन्ही व्यक्ति ख्रिस्ताकडे आल्या परंतु ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी जीवनात येणारी अडखळणे फक्त भिकाऱ्याने दूर केली. त्याने (१) लोकसमुदाय, (२) झगा (ओळख), (३) होता नव्हता तो पैसा यांना ख्रिस्ताकडे जाण्यासाठी स्वतःला रोखू दिले नाही.
१) येशू मला त्याच्या मागे येण्याचे आमंत्रण देत आहे.
२) मी ख्रिस्ताच्या मागे जाऊ इच्छितो काय?
३) मला कोणती अडखळणे ख्रिस्ताकडे जाण्यासाठी रोखून धरतात?
४) मी माझी अडखळणे दूर करु शकतो का?
५) या दोन व्यक्तिंपैकी माझा स्वभाव कसा आहे?
६) येशू मला निरखून पाहात आहे.