खरी धन्यता!

पवित्र शास्त्रातील बरेच शास्त्रपाठ आमच्या मुखोद्गत असतात. आंम्ही अगदी सहजगत्या त्यांचे पाठांतर करतो, परंतु ते उच्चारत असतां त्यांचा गर्भित अर्थ आम्ही लक्षात घेत नाही. अशाच शास्त्रपाठांपैकी एक म्हणजे मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय ५ वचनें १ ते १२. हा शास्त्रपाठ ‘धन्यवाद’ म्हणून सर्वश्रुत आहे. परंतु ‘धन्य’ होणे म्हणजे निश्चित काय? सर्वसाधारण व्यक्तिस अपेक्षित ते सर्व मिळाल्यास ती व्यक्ती स्वत:ला धन्य समजते. या चिंतनाद्वारे पवित्रशास्त्रानुसार ‘धन्य’ होण्याची संकल्पना समजून घेताना जे अंत:करणाचे ‘शुद्ध’ ते धन्य (व. ८) या वचनावर आपले विचार केंद्रीत करुया.
मत्तय ५:१-२, “…तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला.” लूक ६:२०, “तेंव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टि लावून म्हटले…” या दोन्ही वचनांवरुन हे स्पष्ट होते की, येशू खाली बसून आपल्या शिष्यांना शिकवित आहे.
ज्यावेळी यहुदी रब्बी खाली बसून आपल्या शिष्यांस शिकवित असे त्यावेळी तो अधिक अधिकाराने शिकवित असे. आपण आजही अधिकाराच्या खुर्ची बद्दल बोलतो. पोप त्यांचा विशेष संदेश ‘कॅथेड्रा’ वर बसूनच देतात. कॅथेड्रा म्हणजे जेथून विशेष अधिकार घोषीत केला जातो. ‘कॅथेड्रल’ हे अधिकाराचे केंद्र असते. उदा. सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल, अहमदनगर हे सी. एन. आय. च्या चर्चेस साठी धर्म प्रांताचे अधिकार केंद्र आहे.
ख्रिस्त उभा राहून सूचना व इतर शिक्षण देतच असे परंतु या प्रसंगी तो खाली बसून (विशेष अधिकाराने) अति महत्वाचे शिक्षण देत आहे.
या वचनांतील दुसरा महत्वाचा शब्द म्हणजे तो ‘तोंड उघडून’ त्यांना शिकवू लागला. यासाठी मूळ बायबल मध्ये ‘अनॉइगो’ हा ग्रीक शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ अंतःकरणातील सत्य स्पष्ट बोलणे किंवा मन मोकळे करणे. उदा. एकाद्या चोरास पोलीसांनी चांगला मार दिल्यानंतर तो ‘तोंड उघडतो’ म्हणजे या प्रसंगी ख्रिस्त अतिशय तळमळीने त्याच्या अंत:करणातील भावना शिष्यांना सांगत आहे.
मत्तयकृत शुभवर्तमानाच्या ५ व्या अध्यायातील १ ते १२ या वचनांतील ‘धन्यवाद’ आपल्या शिष्यांना शिकवित असतांना येशू ख्रिस्त अरॅमिक भाषेत बोलत आहे. हिब्रू आणि अरॅमिक भाषेत बरेच साम्य होते. येशू ख्रिस्ताने ‘धन्य’ ह्या शब्दासाठी जो शब्द वापरला तो मूळ बायबल मध्ये ‘अशेर’ हा शब्द आहे. हाच शब्द जुन्या करारात स्तोत्र १:१ मध्ये ‘धन्य’ तो पुरुष यासाठी वापरला आहे. हा उद्गारवाचक शब्द असून त्याचा अर्थ ‘अभिनंदन’ असा आहे. म्हणजेच खऱ्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनशैली बद्दल ख्रिस्त भविष्य कालीन नव्हे तर दैनंदिन जीवनात प्राप्त होणाऱ्या प्रतिफळाबद्दल बोलत आहे व त्यांचे अभिनंदन करीत आहे. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सण साजरा करण्यासाठी यहूदी लोक यरुशलेमेस झुंडीच्या झुंडीने जातांना मजल दर मजल मुक्काम करीत असत. त्यावेळी त्यांच्या प्रियजनांशी, आप्तजनांशी भेटी होत असत. दुरुनच एकमेकांचे दर्शन झाल्यावर ते मोठ्याने ‘अशेर’ म्हणून अभिवादन करीत. अर्थ हा कीं तू प्रतिदीनी परमेश्वराच्या आज्ञेनुसार चालत आहेस, तुझे पुढे पुढे पडणारे प्रत्येक पाऊल त्याच्या वसतिस्थानाकडे जात असून तू त्याच्या समक्षतेत जाणार आहेस तुझे अभिनंदन! ज्यामध्ये तू प्रवेश करणार अशी ती अवस्था नसून तू अगोदरच त्यात प्रवेश केला आहेस! हे धन्यवाद म्हणजे येशू ख्रिस्ताने अतिशयीत आनंदाने जाहीर केलेले उद्गारवाचक अभिनंदन आहे. ‘अशेर’ या शब्दांच्या भाषांतरासाठी जो ग्रीक शब्द वापरला आहे तो आहे ‘मकॅरियोस’ व त्याचा अर्थ ‘परीपूर्णता प्राप्त’ असा आहे. ग्रीक लोक सायप्रस बेटास मकॅरियोस म्हणत कारण नैसर्गिक देणग्यांनी परीपूर्ण असे ते बेट असल्यामुळे त्यांना शेजारील राष्ट्रांकडे मदतीसाठी हात पसरावा लागत नसे. म्हणजेच खऱ्या ख्रिस्ती जणांना त्यांच्या जीवनशैलीत अंतर्भूत (समाविष्ट) असलेल्या गोष्टींमुळे जी परीपूर्णता प्राप्त झाली आहे त्याबद्दल येशू ख्रिस्त त्यांचे अभिनंदन करीत आहे. त्यांचे जीवन परीपूर्णतेने भरले असून त्यांना कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही. त्यांचे अभिनंदन!
या वचनांमध्ये ‘आनंदी’ ते लोक जे असे लिहीलेले नाही. कारण ‘आनंदी’ यासाठी इंग्रजी शब्द आहे ‘हॅपी’ व हॅपी या शब्दाचे मूळ आहे ‘हॅप.’ की ज्याचा अर्थ होतो ‘योगायोग’ किंवा ‘अनपेक्षित’ घडलेली गोष्ट. ख्रिस्ती मुनष्याचा आनंद हा योगायोग नव्हे. ख्रिस्ताने त्याचे अभिनंदन केल्यानंतर त्याचा आनंद कोणीही त्याजपासून हिरावून येऊ शकत नाही. तो अविनाशी आहे. कोणतेही दुःख, चिंता, संकट त्या आनंदापासून त्याला वंचित करु शकत नाहीत. ख्रिस्त म्हणतो, “तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही” (योहान १६:२२). हवामानातील किरकोळ बदल सुद्धा योगायोग ठरु शकतात. व मोठे फरक घडवून आणू शकतात. परंतु ख्रिस्त ज्याला ‘धन्य’ म्हणतो किंवा ज्याचे अभिनंदन करतो त्याचा विजय निश्चितच आहे.
वरील पार्श्वभुमीवर आपण आता “जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील” (मत्तय ५:८), या वचनावर चिंतन करु. हे वचन आम्हाला आमचे परीक्षण करण्यास सांगते. ‘शुद्ध’ यासाठी मूळ ग्रीक शब्द आहे ‘कॅथॅरॉस’ व त्याचे ग्रीक भाषेत पाच अर्थ आहेत ते पाचही अर्थ शुद्धतेशी संबंधीत आहेत.
१) कॅथॅरॉस चा पहिला अर्थ आहे स्वच्छ, डागविरहीत असे धुतलेले वस्त्र. मनुष्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ज्यावर कसलाही डाग, कलंक नाही अशी व्यक्ति. मी स्वतः तसा आहे काय? प्रकटीकरण ७:९ मध्ये शुभ्रवस्त्र परिधान केलेल्या मोठ्या लोक समुदायाचे वर्णन केलेले आहे तसेच प्रकटी. १९:८ मध्ये तेजस्वी व शुद्ध असे तागाचे वस्त्र वर्णन केले आहे. हे वस्त्र परिधान केलेले कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले. (व. ९) ‘धन्य’ जण आहेत. मला ती धन्यता लाभली आहे का? माझे वस्त्र डागाळलेले आहे काय?
२) कॅथॅरॉसचा दुसरा अर्थ होतो निवडून, पाखडून स्वच्छ केलेले धान्य, की जे दळण्यासाठी तयार आहे. ज्यामध्ये केरकचरा, खडे, किडे नाहीत. ज्यावर खातरी ठेवून ते दळावे व त्याची भाकरी आनंदाने सेवन करावी, जिच्या द्वारे सात्विक पोषण होऊन ‘वाढ’ होईल, अशी भाकरी की जी चावतांना घासामध्ये खडे येणार नाहीत. थोडक्यात ज्या भाकरीमध्ये भेसळ अथवा मिलावट नसेल. अशी ‘शुद्ध’ भाकरी माझ्या जीवनशैलीतून प्रकट होते का? माझ्याद्वारे सात्विक वचन मिळाल्याने कोणाचे आध्यात्मिक पोषण होऊन त्याची वचनात वाढ होत आहे का? येशू जी ‘जीवनाची भाकर’ ती मी इतरांना वाढतो का? भेसळ करुन वाढतो का? माझ्याठायी निर्भेळ पीठाची शुद्धता आहे का?
३) कॅथॅरॉसचा तिसरा अर्थ आहे दोष विरहीत म्हणजे शारीरिक दौर्बल्य, अपंगत्व, भीति नसलेला, लढाईसाठी सुसज्ज असलेला अव्यंग सैनिक. मी ख्रिस्ताचा दोषरहीत सैनिक असून ख्रिस्तासाठी लढाई करण्यास सज्ज आहे काय? मी रणांगणातून पळणार तर नाही ना?
४) कॅथॅरॉसचा चौथा अर्थ आहे निर्भेळ, सात्विक दूध, की ज्यावर बालकाचे पोषण होते. जे सर्वान्न असून बालकासाठी ‘जीवन’ आहे. ख्रिस्त जो जीवन तो माझ्याद्वारे वचनासाठी भुकेल्यांना मिळत आहे का की ज्यामुळे त्यांची वचनात वाढ होईल?
५) कॅथॅरॉसचा पांचवा अर्थ आहे शुद्ध सोने. ज्यामध्ये कोणताही इतर धातू मिश्रीत करण्यात आलेला नाही व ज्या सोन्याचा उपयोग मुकुट तयार करण्यासाठी होत असे. तसे सोने. मी देवाच्या दृष्टिने भुषणावह अलंकार आहे का? मी शिरोभूषण आहे का?