अकलेचे तारे

अहमदनगर मध्ये बाग बगीचे नाहीत. छावणी विभागामध्ये मात्र एक केंद्रीय हायस्कूल लगत आणि दुसरा अॅनेक्स क्लब जवळ बाग आहे. नगरकरांना तिथे गेल्यानंतर नंदनवनात गेल्यासारखे वाटते. काल संध्याकाळी मी केंद्रीय हायस्कूल लगतच्या बागेमध्ये जॉगिंगला गेलो होतो. बरेचसे चालून झाल्यानंतर मी एका बाकावर विसावलो. थोड्याच वेळात तिथे सुरक्षा रक्षक आला आणि त्याने मला सूचना केली की, “आता आपण बागेतून जावे कारण वेळ खूप झाला आहे” मी भांबावल्यासारखे घड्याळात पाहिले तर खरोखर साडेसात वाजले होते परंतु आकाशात मात्र एकही तारा नव्हता. सुरक्षा रक्षकाला मी सहजच म्हटले की, “अब तक एक भी चांदनी निकली नही है!” तो मला म्हणाला, “बाबूजी, कम से कम पांच साल हो गये, आसमान मे चांदनी दिखना मुश्किल हो गया है!” त्याचे म्हणणे मला पटले कारण खरोखरच मध्यरात्री जरी तुम्ही टेरेस वर गेलात आणि वर आकाशात नजर टाकलीत तर अगदीच दोन-तीन तारे आकाशात दिसतात.
आकाशात ढग नसले तर त्याला निरभ्र आकाश म्हणतात परंतु आकाशात तारका किंवा चांदण्या नसल्यास त्या आकाशाला काय म्हणावे? चांदण्या नसलेले आकाश आमच्या पिढीने कधी पाहिलेच नव्हते. आकाशात चांदण्या नसतील अशी कल्पनाच आम्ही कधीही केली नव्हती कारण आमच्या पिढीला हे सर्व अनैसर्गिक आहे. माझे वय आज ६९ वर्षे आहे. लहानपणी आकाशातील तारका मोजण्याचा प्रयत्न अनेक वेळा मी केला आहे परंतु प्रत्येक वेळी हे अशक्यप्राय आहे याचाच मी अनुभव घेतला.
पवित्रशास्त्रात उत्पत्तीच्या पुस्तकात १५ व्या अध्यायात पाचव्या वचनात ईश्वराने अब्राहामला आशीर्वादित करताना म्हटले की, “आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. तुझी संतती अशीच अगणित होईल.” तसेच उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायात देवाने आकाशात तारे निर्माण करताना म्हटले की, “हे तारे मानवा करिता ऋतू आणि दिशादर्शक होतील.” तारकांचा प्रवाह असलेली आकाशगंगा आज आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही; इतकेच नव्हे तर राशीचक्र सुद्धा दिसत नाहीत. आकाशात पाहून मृग, सिंह या राशींचे तारे नजरेने जोडणे, वृश्चिक राशीचा तारकापुंज डोळ्यात साठवणे तसेच पाठ्यपुस्तकात शिकल्याप्रमाणे सप्तर्षींच्या डोक्यावरील दोन तारकांना सरळ रेषेत नजरेने छेदून तीच रेषा पुढे नेली की ती उत्तर ध्रुवतार्याला भेटायची. हा आनंद अगदी नेहमीचाच होता. ध्रुव ताऱ्याला पाहून उत्तर दिशा निश्चित करणे ही अलिखित परंतु पूर्ण खात्रीशीर अशी शाश्वती होती
आज आकाशात दिशादर्शक ध्रुवताराच दिसत नाही. महाकाय किंवा सामर्थ्यशाली दुर्बिणीतून ध्रुवतारा दिसत असणार. म्हणजेच आम्हाला आमची दिशा ठरविताना आमच्या अकलेचे(दुर्बिणीचे सहाय्य) तारे जमेस धरावे लागतात. समाजाला, राष्ट्राला दिशा देणाऱ्या व्यक्तीही आता लवकर दिसत नाहीत, सापडत नाहित, खूप शोध घेतल्यास तार्यांप्रमाणेच क्वचितच एक-दोन आढळतात. ज्यांच्या चरणी मस्तक टेकवावे असे चरण दुर्मिळ झाले आहेत. हे सर्व होण्यास आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून लावलेले शोध व त्या अनुषंगाने केलेले नैसर्गिक, बौद्धिक व मानसिक प्रदूषण कारणीभूत आहे. आज साठ वर्षांवरील सर्व नागरिक अतिव खेदाने म्हणतात की आजची पिढी भरकटत चालली आहे. “नैतिकतेकडे” नेणारी पाटी जीवनाच्या मार्गदर्शक फलकावरून नाहीशी झाली आहे. त्या मार्गावरून क्वचितच प्रवास केला जातो म्हणूनच त्याची डागडूजीही होत नाही. संस्कृतीच्या आकाशात नीतीमूल्यांचे तारे आज दिसत नाहीत आकाशात तारे नसणे हे जसे अनैसर्गिकतेचे लक्षण आहे तसेच मानवी संस्कृतीत नीती आणि नाती नसणे हे सुद्धा अनैसर्गिक आहे. नाहीतरी पुष्कळ अनैसर्गिक गोष्टींनी मानवी संस्कृतीत धुमाकूळ घातलाच आहे. नैतिकतेच्या मैलाचा दगड जीवनाच्या राजमार्गातून नाहीसा झाला आहे.
चांदनी रात है, लाख तारे आसमान मे, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, चंद्र खेळे चांदण्याशी लपाछपी, चांदणे शिंपीत जाशी, इत्यादी गीते ऐकून भविष्यात अचंबित होणाऱ्या भावी पिढीला आम्ही या गीतांचा भावार्थ किंवा स्पष्टीकरण काय देणार आहोत?
असो, सध्या तरी अकलेचे तारे तोडण्यात दिवस घालवावे लागणार आहेत!